मराठमोळा ऋतुराज गायकवाड इतिहास रचणार, विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडणार

Ind vs Aut 5th T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी20 सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांची नजर असणार आहे ती टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडवर

राजीव कासले | Updated: Dec 3, 2023, 03:16 PM IST
मराठमोळा ऋतुराज गायकवाड इतिहास रचणार, विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडणार title=

Ind vs Aut 5th T20 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतिम सामना रंगला. स्पर्धेच्या दोन दिवसानंतर लगेचच भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतले चार सामने खेळवण्यात आले असून भारताने 3-1 अशी आघाडी घेतली आहे. आज मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना रंगणार असून हा सामना जिंकत दक्षिण आफ्रिका  (India Tour of South Africa) दौऱ्यावर विजयी आत्मविश्वासाने जाण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. येत्या दहा तारखेपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. 

ऋतुराज गायकवाड जबरदस्त फॉर्मात
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे ती मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडवर (Ruturaj Gaikwad). टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यापासून ऋतुराज केवळ 19 धावा दूर आहे. द्विपक्षीय टी20 मालिकेत भारतातर्फे सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत ऋतुराज पहिल्या स्थानावर पोहोचेल. ऋतुराजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार टी20 सामन्यात 71 च्या अॅव्हरेजने 213 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. 

द्विपक्षीय टी20 मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. किंग कोहलीने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 231 धावा केल्या होत्या. तर या यादीत केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. केएल राहुलने 2020 मध्ये न्यूझीलंडविरोधातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 224 धावा केल्या आहेत. 

प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. ऑलराऊंडर अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी वॉश्विंटना सराव देण्याच्या दृष्टीने त्याचा संघात समावेश केला जाईल. अक्षर पटेलला दक्षिण आफ्रिका दौऱअयात टी20 संघात जागा मिळालेली नाही. याशिवाय ऑलराऊंडर शिवम दुबेलाही प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. 

पाचव्या सामन्यासाठी भारतीय संघाची संभाव्य प्लेईंग XI
ऋतुराज गायकवाड़, यशस्वी जायसवाल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, दीपक चाहर, मुकेश कुमार.

पाचव्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची संभाव्य प्लेईंग XI
जोश फिलिप, ट्रेविस हेड, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेविड, मैथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (विकेटकीपर/कर्णधार), बेन ड्वारशुइस, क्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा.

भारत-ऑस्ट्रेलिया टी20 आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड

एकुण सामने - 30
भारत विजयी : 18
ऑस्ट्रेलिया विजयी : 11
निकाल नाही : 1

भारतात दोन्ही संघांची कामगिीर
एकूण सामने : 13
भारत विजयी : 8
ऑस्ट्रेलिया विजयी : 5