टीम इंडियाकडे सीरिज जिंकण्याची संधी, दुसऱ्या वन डेत संजू सॅमसनला संधी? अशी असेल प्लेईंग-11

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे, आता दुसरा सामना जिंकत सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 29, 2023, 01:55 PM IST
टीम इंडियाकडे सीरिज जिंकण्याची संधी, दुसऱ्या वन डेत संजू सॅमसनला संधी? अशी असेल प्लेईंग-11 title=

India vs West Indies 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना  आज ब्रिजटाऊच्या केसिंग्टन ओवल मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने (Team India) पाच विकेट राखून विजय मिळवला होता. पण विजयाचं माफक आव्हान पार करतानाही भारताची दमछाक झाली होती. युवा खेळाडूंना पहिल्यांदा फलंदाजीला पाठवण्याचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) प्रयोग फारसा यशस्वी ठरला नव्हता. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या अपयशी ठरले होते. शेवटी रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मानेच मैदानावर उतरत सामना जिंकून दिला होता. 

आता दुसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिकेवर कब्जा मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाला आहे. हा सामना जिंकला तर वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) भारताचा हा सलग 13 वा एकदिवसीय मालिका विजय ठरणार आहे. भारताने वेस्टइंडिजविरुद्ध सलग बारा एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. एका संघाविरुद्ध सर्वाधिक मालिका जिंकण्याचा हा विश्वविक्रम आहे. आता भारतीय संघाकडे हा विक्रम आणखी मजबूत करण्याची संधी आहे. वेस्टइंडिजने भारताविरुद्ध शेवटची 2006 मध्ये एकदिवसीय मालिका जिंकली होती. 

एका संघाविरुद्ध सर्वाधक विजय
भारत विरुद्ध वेस्टइंडिज - 2007-2022* -  12 मालिका
पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे - 1996-2021 - 11 मालिका
पाकिस्तान विरुद्ध वेस्टइंडिज - 1996-2021 - 10 मालिका
दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे - 1995-2018 - 9 मालिका
भारत विरुद्ध श्रीलंका - 2007-2021 - 9 मालिका

भारतासाठी महत्त्वाची सीरिज
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी ही मालिका आत्मविश्वास वाढवणारी ठरणार आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयकडून संघबांधणी केली जातेय. 

सूर्याच्या फलंदाजीला ग्रहण
संघबांधणीसाठी बीसीसीआय युवा खेळाडूंवर भर देत आहेत. पण चिंतेची गोष्ट म्हणजे युवा खेळाडू अद्यापही आपली जागा पक्की करु शकलेले नाहीत. टी20 तला आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव एकदिवसीय सामन्यात अपयशी ठरतोय. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही सूर्या केवळ 19 धावा करुन बाद झाला. आतापर्यंत खेळलेल्या 24 एकदिवसीय सामन्यात सूर्याला केवळा दोन अर्धशतकं करता आली आहेत. दुसरीकडे श्रेयस अय्यर आणि केएल राहुल फिट होऊन टीममध्ये परतले तर सूर्यकुमारला 15 खेळाडूंच्या यादीतही स्थान मिळवणं मुश्किल होईल. 

संजू-चहलला प्लेईंग-11 मध्ये एन्ट्री?
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काही प्रयोग बघायला मिळण्याची शक्यताआहे. सूर्यकुमार यादवच्या जागी संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी मिळू शकते. तर पहिल्या सामन्यात फिरकीला जशी साथ मिळत होती, त्यावरुन दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एका वेगवान गोलंदाजाऐवजी युजवेंद्र चहलला संघात स्थान मिळेल. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या भारताच्या फिरकी जोडीने तब्बल 7 विकेट घेतल्या होत्या. आता त्यांच्या जोडीला चहलाची एन्ट्री होऊ शकते. म्हणजे संघात तीन फिरकी गोलंदाज आणि 1 वेगवान गोलंदाज अशी टीम असू शकते.