धोनीचा ऐतिहासिक विक्रम! हे रेकॉर्ड करणारा एकमेव खेळाडू

शेन वॉटसनच्या वादळी शतकामुळे चेन्नईनं तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

Updated: May 27, 2018, 11:17 PM IST
धोनीचा ऐतिहासिक विक्रम! हे रेकॉर्ड करणारा एकमेव खेळाडू  title=

मुंबई : शेन वॉटसनच्या वादळी शतकामुळे चेन्नईनं तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. हैदराबादनं ठेवलेल्या १७९ रनचा पाठलाग करताना चेन्नईनं १८.३ ओव्हरमध्ये १८१/२ एव्हढा स्कोअर करत ८ विकेटनं ही मॅच जिंकली. शेन वॉटसननं ५७ बॉलमध्ये नाबाद ११७ रन केल्या. वॉटसनच्या खेळीमध्ये ८ सिक्स आणि ११ फोरचा समावेश होता. वॉटसननं या मॅचची सुरुवात अतिशय संथ केली. भुवनेश्वर कुमारची पहिली ओव्हर वॉटसननं मेडन खेळून काढली. पहिल्या १० बॉलमध्ये वॉटसनला एकही रन काढता आली नाही पण त्यानंतरच्या ४१ बॉलमध्ये वॉटसननं शतक पूर्ण केलं.

धोनीचा विक्रम 

या मॅचमध्ये चेन्नईचा कर्णधार आणि विकेट कीपर एम.एस.धोनीनं विक्रम केला आहे. हैदराबादची बॅटिंग सुरु असताना करण शर्माच्या बॉलिंगवर धोनीनं केन विलियमसनला स्टम्पिंग केलं. आयपीएलमधलं धोनीचं हे ३३वं स्टम्पिंग होतं. याआधी रॉबिन उथप्पाच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. रॉबिन उथप्पानं आत्तापर्यंतच्या ११ आयपीएलमध्ये ३२ स्टम्पिंग केले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्येही धोनीच्याच नावावर हा विक्रम आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये आत्तापर्यंत एकूण २९३ स्टम्पिंग झाले आहेत. यापैकी सर्वाधिक ७३ स्टम्पिंग धोनीनं केले आहेत.