'धोनीलाच निवृत्तीचा निर्णय घेऊ द्या'

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर महेंद्रसिंग धोनीवर टीका होत आहे. 

Updated: Jul 22, 2018, 06:03 PM IST
'धोनीलाच निवृत्तीचा निर्णय घेऊ द्या' title=

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर महेंद्रसिंग धोनीवर टीका होत आहे. याचबरोबर धोनीच्या निवृत्तीचा चर्चाही सुरू झाल्या आहेत. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनम मात्र धोनीची पाठराखण केली आहे. निवृत्ती कधी घ्यायची याचा निर्णय धोनाला घेऊ द्या. आपल्यामध्ये किती वर्षांचा खेळ बाकी आहे हे खेळाडूला माहिती असतं. त्यामुळे धोनी योग्यवेळी निवृत्ती जाहीर करेल, असं सचिन म्हणाला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिननं आपलं मत मांडलं.

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताला १-२ने पराभव सहन करावा लागला. या सीरिजनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेमध्ये धोनीनं केलेल्या संथ फलंदाजीनंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. तिसरा एकदिवसीय सामना संपल्यानंतर धोनीनं अंपायरकडून बॉल मागून घेतला. २०१४ मध्ये टेस्ट निवृत्त होण्याआधी त्यानं असाच प्रकार केला होता. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु झाल्या. या सगळ्या चर्चानंतर भारताचा प्रशिक्षक रवी शास्त्रीनं प्रतिक्रिया दिली.

धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या रवी शास्त्रीनं फेटाळून लावल्या आहेत. धोनीच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नाही. धोनीनं अंपायरकडून बॉल घेतल्याचं कारणही रवी शास्त्रीनं सांगितलं आहे. धोनीनं बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण यांच्यासाठी अंपायरकडून बॉल घेतल्याचं रवी शास्त्रीनं स्पष्ट केलं. इंग्लंडमधल्या वातावरणाचा अंदाज यावा हे पाहण्यासाठी भरत अरुणला बॉल किती घासला गेला आहे हे पाहायचं होतं, असं रवी शास्त्रीनं सांगतिलं.

धोनीची संथ बॅटिंग

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये संथ बॅटिंग केल्यामुळे धोनीवर टीकेची झोड उठली आहे. तिसऱ्या वनडेमध्ये धोनीनं ६६ बॉल खेळून ४२ रन केले. तर दुसऱ्या वनडेमध्ये धोनीनं ५९ बॉलमध्ये ३७ रन केले. या दोन्ही मॅचमध्ये भारताचा पराभव झाला.