ICC ODI Ranking : भारताला मागे टाकत इंग्लंड अव्वल स्थानी

आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये इंग्लंडने भारताला मागे टाकत अव्वल स्थान मिळवलेय. २०१३नंतर इंग्लंडने पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवलेय. 

Updated: May 2, 2018, 04:40 PM IST
ICC ODI Ranking : भारताला मागे टाकत इंग्लंड अव्वल स्थानी title=

दुबई : आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये इंग्लंडने भारताला मागे टाकत अव्वल स्थान मिळवलेय. २०१३नंतर इंग्लंडने पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवलेय. प्रशिक्षक ट्रेवॉर बोलिस यांचे मार्गदर्शन आणि कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०१४-१५मध्ये खेळवण्यात आलेल्या ६३ पैकी ४१ सामन्यांत विजय मिळवला. इंग्लंडने गेल्या सहा वनडे मालिकेत विजय मिळवलाय. २०१७मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सेमीफायनल गाठली होती. तसेच २०१९मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठी इंग्लंडला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. 

या वर्षी जानेवारीमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत ४-१ अशी मात दिली होती. त्यानंतर मार्चमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सीरिजमध्ये ३-२ असा विजय मिळवला. कसोटी क्रमवारीत इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. याशिवाय टी-२० रँकिंगमध्ये इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे तर पाकिस्तान पहिल्या स्थानावर आहे. 

इंग्लंडचा संघ १२५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे तर दुसरीकडे भारत १२२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे ११३ गुण आहेत. न्यूझीलंड त्यांच्या मागे चौथ्या स्थानावर आहे. बाकी रँकिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये. क्रमवारीत पहिल्या १० स्थानांवर असलेले संघ पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये खेळणार आहेत. वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आठ गुण गमावून पाचव्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान सहाव्या स्थानावर आहे. 

टी-२०मध्ये पाकिस्तान अव्वल

टी-२० क्रमवारीत पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानावर आहे. अफगाणिस्तान श्रीलंकेपेक्षा एक पाऊल पुढे टाकत आठव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर न्यूझीलंड आणि इंग्लंडचा संघ आहे.

कसोटीत भारतच बादशाह

कसोटी क्रमवारीत भारताने अव्वल स्थान कायम ठेवलेय. सलग दुसऱ्या वर्षी भारत या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. ऑक्टोबर २०१६नंतर भारत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.