'विराट कोहली साधा एक षटकारही न मारता...', भारताच्या माजी खेळाडूचा मोठा दावा, म्हणाला 'मला 100 टक्के खात्री'

भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी विराट कोहलीसंबंधी (Virat Kohli) मोठं विधान केलं आहे. तसंच टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळण्यासाठी तो पात्र असल्याचं सांगत कौतुकाची थाप दिली आहे.  

शिवराज यादव | Updated: Aug 17, 2023, 06:39 PM IST
'विराट कोहली साधा एक षटकारही न मारता...', भारताच्या माजी खेळाडूचा मोठा दावा, म्हणाला 'मला 100 टक्के खात्री' title=

टी-20 वर्ल्डकप झाल्यापासून भारताने एकूण 13 टी-20 सामने खेळले आहेत. मात्र यामधील एकाही सामन्यात विराट कोहली खेळलेला नाही. यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा ना बीसीसीआयने केला आहे, ना विराट कोहलीने यावर काही भाष्य केलं आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार, भविष्याचा विचार करत विराट कोहलीला टी-20 संघातून बाहेर ठेवलं जात आहे. जेणेकरुन एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळताना त्याच्यावर जास्त ओझं येणार नाही. तसंच टी-20 मध्ये जास्तीत जास्त तरुण खेळाडूंना संधी देण्याकडे बीसीसीआयचा कल दिसत आहे. 

पण वेस्ट इंडिजमध्ये टी-20 मालिकेत भारताचा पराभव झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे फक्त अनुभवी खेळाडू असून, गोलंदाजीतही मर्यादा येत आहेत. याशिवाय शुभमन गिल, ईशान किशन हेदेखील अपयशी ठरले आहेत. दुसरीकडे ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जाडेजा यांना संघात पुन्हा स्थान दिलं जातंय का याकडे लक्ष आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी अद्याप 10 महिने शिल्लक असताना भारत अद्यापही संघ बांधू शकलेला नाही. 

2007 मध्ये, जेव्हा तेंडुलकर आणि द्रविड यांना संघातून वगळण्यात आलं होतं तेव्हा एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघात रॉबिन उथप्पा, गौतम गंभीर, युवराज सिंग आणि रोहित शर्मा यांसारख्या खेळाडूंनी त्यांचं स्थान पक्कं केलं होतं. ज्यामुळे वरिष्ठ खेळाडूंना संघात पुनरागमन करण्यासाठी फार संधी उरलेली नव्हती. परंतु सध्याच्या भारतीय T-20 संघात अशी कामगिरी होताना दिसत नाही. फलंदाजीत सर्वात जास्त समस्या दिसत आहेत असं भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी म्हटलं आहे. कोहलीने पुढील वर्षी कॅरिबियनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत असावा असं मत त्यांनी मांडलं आहे. 

"100 टक्के...विराट कोहलीने मागील वर्ल़्डकपमध्ये काय कामगिरी केली होती ते पाहा. काही अटीतटीच्या सामन्यांमध्ये त्याने चांगली खेळी केली होती. हे महत्त्वाचे सामने असून यामध्ये राष्ट्रभावना गुंतलेल्या असतात. एक छोटी चूकही मोठा फरक पाडू शकते. अशावेळी तुम्हाला अशा स्थितीत खेळणाऱ्या अनुभवी खेळाडूंची गरज असते. अशावेळी तुमचा स्ट्राइक रेट किती किंवा तुम्ही आयपीएलमध्ये काय कामगिरी केली आहे हे महत्त्वाचं नसतं. मोठ्या खेळांमध्ये तुम्हाला मोठ्या कामगिरीची गरज असते आणि विराटने ते दाखवलं आहे," असं संजय बांगर यांन The Cricket Basu या युट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

"कोहलीची खेळण्याची एक पद्धत, जोरदार फटके मारणं हेच महत्त्वाचं नाही"

संजय बांगर यांनी यावेळी मागील टी-20 मधील विराटच्या कामगिरीचा संदर्भ दिला. मागील टी-20 वर्ल्डकपमध्ये विराटने 6 सामन्यात 98.66 च्या सरासरीने 296 धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरोधात विराटने केलेली 82 धावांची जबरदस्त खेळी तर आजही सर्वांच्या लक्षात आहे. या सामन्यात विराटने पाकिस्तानच्या हातातून विजय खेचून आणला होता. 

"भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना आठवा, किंवा 2016 च्या T20 विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना आठवून पाहा. विराट कोहलीने सातत्याने चांगली खेळी करत आहे. प्रत्येकाची धावा करण्याची स्वतःची शैली आहे, आणि सामना जिंकण्यासाठी षटकार लगावणारे खेळाडूच हवेत असं नाही. तसं असतं तर वेस्ट इंडिजने सर्व T20 विश्वचषक जिंकले असते. कोहली असा खेळाडू आहे जो एकही षटकार न मारता 100 धावा करत शतक ठोकू शकतो. तुमच्याकडे दबावात खेळणारे खेळाडू नसतील तर तुम्ही अडचणीत आहात," असंही संजय बांगरने सांगितलं आहे.