"मला विष देण्यात आलं होतं, शाहिद आफ्रिदीने 40 ते 50 लाख....," पाकिस्तानी क्रिकेटरच्या आरोपांनी क्रिडा विश्वात खळबळ

Pakistan Cricket: पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने एका धक्कादायक दावा केला असून यानंतर खळबळ माजली आहे. इम्रान नजीर (Imran Nazir) याने आपण करिअरच्या सर्वोच्च स्थानी असताना आपल्या विषयप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला आहे.   

Updated: Mar 24, 2023, 08:25 AM IST
"मला विष देण्यात आलं होतं, शाहिद आफ्रिदीने 40 ते 50 लाख....," पाकिस्तानी क्रिकेटरच्या आरोपांनी क्रिडा विश्वात खळबळ title=

Former Pakistan cricketer shocking revelation: पाकिस्तान क्रिकेटर्स (Pakistan Cricket) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेले असतात. त्यामुळेच त्यांच्यासंबंधी एखादा वाद समोर आला तर अनेकदा आश्चर्य वाटत नाही. मग ते रमीज राजाने अचानक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखदावरुन हटणं असो अथवा एका महिलेने बाबर आझमविरोधात लैंगिक अत्याचाराचे केलेल आरोप असोत...पाकिस्तान क्रिकेटने सर्व काही पाहिलं आहे. यादरम्यान आता पाकिस्तानच्या माजी फलंदाजाच्या एका आरोपाची यात भर पडली आहे. पाकिस्तानचा माजी आघाडीचा फलंदाज इम्रान नजीर (Imran Nazir) याने आपण करिअरमधील सर्वोच्च स्थानी असताना विषप्रयोग (Poision) झाल्याचा आरोप केला आहे. त्याच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. 

इम्रान नजीरने 1999 ते 2012 दरम्यान पाकिस्तानकडून 8 कसोटी आणि 79 एकदिवसीय सामने खेळले आहेत. गेल्या मे महिन्यात त्याने आपल्या आजाराचा खुलासा केला होता. दरम्यान, आता मात्र त्याने धक्कादायक दावे केले असून यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डात खळबळ माजली आहे. 

"माझ्यावर नुकतेच उपचार केल्यानंतर एक निवेदन प्रसिद्ध कऱण्यात आलं. यामध्ये मला मर्क्यूरी (Mercury) देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. हे धीम्या गतीने प्रभाव करणारं विष आहे. हे विष तुमच्या सांध्यापर्यंत पोहोचून नुकसान करतं. गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये माझ्या सर्व सांध्यांवर उपचार करण्यात आले आहेत. माझ्या सर्व सांध्यांना दुखापत झाली होती आणि यामुळे सहा ते सात वर्षं मी त्रास सहन केला. पण त्यावेळी मी देवाकडे प्रार्थना करत होतो की, मला अंथरुणाला खिळवून ठेवू नको. देवाच्या कृपने तसं काही झालं नाही," अशी माहिती नाजीर अलीने नादीर अली पॉडकास्टमध्ये दिली. 

"मी जेव्हा नीट चालत वैगेरे होतो तेव्हा अनेकजण मला तू एकदम व्यवस्थित दिसत आहेस असं सांगायचे. यावेळी मला अनेकांवर शंका आली होती. पण मी कधी काय खाल्लं आठवत नाही. कारण ते विष लगेच प्रभाव दाखवत नाही. ते तुम्हाला अनेक वर्ष मारत असतं. ज्याने कोणी हे केलं त्याच्यासाठी आजही मी वाईट हेतू चिंतित नाही. जो व्यक्ती तुम्हाला मारतो त्यापेक्षा जो वाचवतो तो मोठा असतो," असं नजीरने यावेळी सांगितलं. 

नजीरने यावेळी उपचार करत पुन्हा आपल्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्याला बचत केलेले सर्व पैसे खर्च करावे लागले अशी माहिती दिली. आपले जवळपास 12 ते 15 कोटी खर्च झाल्याचं त्याने सांगितलं. आपल्या या संकटाच्या काळात शाहिद आफ्रिदी पाठीशी उभा राहिला आणि आपण त्याचे हे उपकार कधीच विसरु शकत नाही अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. 

"मी आयुष्यभर केलेली सर्व बचत उपचारावर खर्च केली. शेवटच्या उपचारात मला शाहिद आफ्रिदीने फार मदत केली. मला गरज असताना तो नेहमी उभा होता. मी जेव्हा शाहिद आफ्रिदीने भेटलो तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं. एका दिवसात डॉक्टरांना पैसे मिळाले. त्याने पैशांची कितीही गरज असली तरी हरकत नाही, माझा भाऊ बरा झाला पाहिजे असं डॉक्टरांना सांगितलं. त्याने जवळपास 40 ते 50 लाख खर्च केले. त्याने त्याच्या मॅनेजरला किती गरज आहे असं न विचारता पैसे पाठवत राहा असं सांगितलं आहे. मी माझ्या डॉक्टरलाही श्रेय देऊ इच्छितो. त्यांनी कधी मला फसवण्याचा प्रयत्न केला नाही. जितक्या पैशांची गरज होती तितकेच घेतले," असं नजीरने सांगितलं. 2018 मध्ये नजीर T10 League मध्ये आपला शेवटचा सामना खेळला होता.