'पृथ्वीमध्ये दिसतेय वीरेंद्र सेहवागची झलक'

एखाद्या तरुण खेळाडूला मायदेशात चांगली कामगिरी करताना पाहिल्यावर फार बरे वाटते.  

Updated: Apr 9, 2019, 09:08 AM IST
'पृथ्वीमध्ये दिसतेय वीरेंद्र सेहवागची झलक' title=

मुंबई : अवघ्या १९ वर्षांच्या पृथ्वी शॉची चर्चा त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापासूनच होत आहे. कसोटी पदार्पणात केलेल्या शतकी खेळीमुळे त्याने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. आता, वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन ब्रायन लारानेही मुंबईकर पृथ्वी शॉचे कौतुक केले आहे. 'पृथ्वी ज्या प्रकारे खेळतो, ते पाहून मला त्यामध्ये वीरेंद्र सेहवागची झलक दिसते', अशा शब्दांत लाराने पृथ्वीचे कौतुक केले आहे. पृथ्वी शॉ सध्या आयपीएलमध्ये दिल्ली टीमकडून खेळत आहे.

पृथ्वी शॉमध्ये लाराला भारताचा विस्फोटक बॅट्समन वीरेंद्र सेहवागचे रुप दिसते. सेहवाग फार हुशारीने बॉलला कट करत त्याला दिशा द्यायचा. तसेच शॉर्ट आर्म पूल मारायचा त्याच प्रकारे पृथ्वीदेखील तसेच शॉट मारतो. असे शॉर्ट मारताना मला पृथ्वीमध्ये सेहवागचे दर्शन होते. 

'स्टार स्पोर्टस'शी बोलताना लारानं हे वक्तव्य केलं. 'पृथ्वी एक परिपक्व खेळाडू आहे. त्याची खेळण्याच्या शैलीत मला सेहवागची झलक दिसते. राजकोटमध्ये पदार्पणात केलेले कसोटी शतक करताना मी त्याला पाहिले होते. त्यामुळे मी पृथ्वीच्या खेळीने चांगलाच प्रभावित झालोय', असे लारा म्हणाला. 

'मी पृथ्वीला मागच्या ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना पाहिले. तो फार चांगल्या पद्धतीने खेळला. एखाद्या तरुण खेळाडूला मायदेशात चांगली कामगिरी करताना पाहिल्यावर फार बरे वाटते. पृथ्वी शॉची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीदेखील निवड झाली होती. परंतु दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाही'. लाराच्या म्हणण्यानुसार पृथ्वीचे वय जरी १९ असले तरी आयपीएलच्या दोन पर्वात खेळून तो सीनियर खेळाडू झाला आहे.