इंडिया-इंग्लंड नाही, तर हा संघ T 20 World Cup जिंकणार, दिग्गजाची भविष्यवाणी

 टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T 20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली.

Updated: Oct 18, 2021, 04:14 PM IST
इंडिया-इंग्लंड नाही, तर हा संघ T 20 World Cup जिंकणार, दिग्गजाची भविष्यवाणी title=

यूएई : टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T 20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. टीम इंडिया (Team India) आज (18 ऑक्टोबर) या क्रिकेटच्या 'रन'संग्रामात सराव सामना खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर इंग्लंड असणार आहे. तर विराटसेना वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतील पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 24 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेले असे अनेक संघ आहेत, जे टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंग करु शकतात. दरम्यान हा टी 20 वर्ल्ड कप कोण जिंकणार, याबाबतची भविष्यवाणी ही ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मायकल हसीने (Michael Hussey) केली आहे. (I really hope to Australia win the title T 20 World Cup 2021 says  former cricketer michael hussey)

हसी काय म्हणाला?  

"वास्तवात ऑस्ट्रेलियाच टी 20 वर्ल्ड कप जिंकेल, अशी आशा आहे. आमची टीम मजबूत आहे आणि आक्रमक आहे.  जर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावलेला असेल, आणि त्यांनी तेथील परिस्थितीशी जुळवून घेतलं, तर हा संघ परिपूर्ण आहे आणि आशा आहे टी 20 वर्ल्ड कप जिंकतील", असं हसी म्हणाला. हसी  फॉक्सस्पोर्ट्स डॉट कॉमसोबत बोलत होता. यावेळेस त्याने हे वक्तव्य केलं.

हसीला टीम बद्दल विश्वास वाटणं साहजिक आहे. प्रत्येक आजी माजी खेळाडूला आपल्या देशाच्या क्रिकेट टीमनेच वर्ल्ड कप जिंकावा असं वाटतं. मात्र ऑस्ट्रेलियाची कामगिरी गेल्या काही महिन्यांपासून निराशजानक राहिली आहे.

ऑस्ट्रेलियाला फेब्रुवारी 2020 पासून एकदाही टी 20 मालिका जिंकता आलेली नाही. या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी कांगारुंना इंग्लंड, टीम इंडिया, न्यूझीलंड, वेस्टइंडिज, बांगलादेश या टीमकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

ग्लेन मॅक्सवेलचं कौतुक 

हसीने या भविष्यवाणीसह अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचं कौतुक केलं. हसीने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या 14 व्या मोसमात 6 अर्धशतकांच्या मदतीने 513 धावांचा रतीब घातला होता.

"मॅक्सवेलला खेळताना पाहणं सुखद होतं. तो अफलातून खेळतोय. त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे. विशेष म्हणजे त्याने यूएईमध्ये चांगली कामगिरी केली. मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा आणि अनुभवी खेळाडू आहे. मॅक्सवेल आयपीएलप्रमाणेच टी 20 वर्ल्ड कपमध्ये ही कामगिरी कायम ठेवेल", असा विश्वास हसीने व्यक्त केला. 

ऑस्ट्रेलियाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील सुपर 12 (Super 12)  मोहिमेची सुरुवात  ही 23 ऑक्टोबरपासून होत आहे. या सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध भिडणार आहे.