क्रिकेटच्या नियमांमध्ये हे बदल होणार

लवकरच क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल करायचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे.

Updated: Sep 26, 2017, 04:55 PM IST
क्रिकेटच्या नियमांमध्ये हे बदल होणार  title=

मुंबई : लवकरच क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल करायचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे. यामध्ये बॅटचा आकार, मैदानातली गैरवर्तणूक आणि डिसीजन रिव्ह्यू सिस्टिममध्ये बदल करण्यात येणार आहेत.

२८ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या सीरिजपासून हे बदल अमलात आणले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेशमध्ये युएईमध्ये होणाऱ्या टेस्ट सीरिजपासून हे नवे नियम लागू होतील. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमेटसाठी आता सगळे नियम सारखे असणार आहेत.

बॅटचा आकार

बॅट आणि बॉलमध्ये संतूलन ठेवण्यासाठी बॅटच्या आकारावर आयसीसीकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार बॅटच्या एजची जाडी ४० मिलीमिटरपेक्षा जास्त, तर खोली ६७ मिलीमिटरपेक्षा जास्त असू शकणार नाही. बॅटचा आकार पाहण्यासाठी अंपायर यंत्र घेऊन मैदानात उतरणार आहेत. तसंच बॅटचा दांडा हा संपूर्ण बॅटपेक्षा ५४ टक्क्याहून अधिक चालणार नाही.

स्लेजिंग किंवा अंपायरसोबतचं भांडण पडणार महागात

मैदानामध्ये गैरवर्तणूक, स्लेजिंग किंवा अंपायरशी भांडण केलं तर क्रिकेटपटूला संपूर्ण मॅचमध्ये बाहेर बसवण्याचा कडक नियम आयसीसीनं केला आहे. अंपायरला धक्काबुक्कीची धमकी देणं किंवा धक्काबुक्की करणं, खेळाडू किंवा अन्य व्यक्तीवर शारिरीक हल्ला करणं किंवा हिंसेचं कोणतंही कृत्य केलं तर लेवल ४ च्या अपराधाअंतर्गत खेळाडूला संपूर्ण मॅचसाठी मैदान सोडावं लागेल.

बाऊंड्री लाईनवरचा कॅच

बाऊंड्री लाईनवर हवेत कॅच पकडत असताना खेळाडूला मैदानाच्या आतमध्येच असावं लागणार आहे. तसं नसलं तर त्याला फोर मानलं जाणार आहे. बॉल बॅट्समनच्या हेल्मेटला लागून खेळाडूनं कॅच पकडला किंवा विकेटकीपरनं स्टम्पिंग केलं तर आऊट देण्यात येणार आहे.

डीआरएस

याआधी डीआरएसमध्ये अंपायर्स कॉल आला तर रिव्ह्यूचं नुकसान व्हायचं. पण आता डीआरएस घेतल्यावर अंपायर्स कॉल आला तर टीमचा रिव्ह्यू वाचणार आहे. टेस्ट क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये प्रत्येक टीमला दोन अयशस्वी रिव्ह्यू घेता येतील. तर आता टी-20मध्येही डीआरएस असणार आहे.

रनआऊट

रनआऊटच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. पॉपिंग क्रिजच्या आतमध्ये आल्यावर बॅट्समनची बॅट किंवा स्वत: बॅट्समन हवेत गेला तर त्याला आऊट दिला जाणार नाही.