Rohit Sharma: कॅप्टन्सी कॉन्ट्रोवर्सीमध्येच हार्दिकची रोहितला 'जादू की झप्पी', गळाभेटीचा व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma: 15 डिसेंबर रोजी मुंबईने सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून घोषित केलं. तेव्हापासून मुंबई इंडियन्सचे चाहते फ्रँचायझीवर नाराज आहेत.

सुरभि जगदीश | Updated: Mar 20, 2024, 11:11 PM IST
Rohit Sharma: कॅप्टन्सी कॉन्ट्रोवर्सीमध्येच हार्दिकची रोहितला 'जादू की झप्पी', गळाभेटीचा व्हिडीओ व्हायरल title=

Rohit Sharma: येत्या 22 तारखेपासून आयपीएल 2024 सुरूवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळाला. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मोठी खळबळ उडाली होती, ती म्हणजे हार्दिक पंड्याला कर्णधार बनवल्याने. मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायझीने खळबळजनक निर्णय घेत रोहितला डावलून हार्दिक पंड्याला कर्णधार केलं. या निर्णयामुळे मुंबईचे चाहते चांगलेच संतापले होते. इतकंच नाही तर रोहित आणि हार्दिक यांच्यामध्ये नाराजी असल्याचंही म्हटलं जात होतं. अशातच आता एक व्हिडीओ समोर आला आहे. 

हार्दिक आणि रोहितचा मैदानावरील व्हिडीओ व्हायरल

15 डिसेंबर रोजी मुंबईने सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून घोषित केलं. तेव्हापासून मुंबई इंडियन्सचे चाहते फ्रँचायझीवर नाराज आहेत. रोहित आणि हार्दिक यांच्यातील संबंध बिघडल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. दरम्यान चाहत्यांची नाराजी आणि अटकळ आणि दावे शांत करण्यासाठी मुंबई इंडियन्सने दोन्ही खेळाडूंचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

बुधवारी नव्या सिझनच्या तयारीत व्यस्त असलेल्या मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ टीमच्या प्रॅक्टिसचा होता. या व्हिडीओमध्ये सर्व खेळाडू एकत्र उभे दिसतायत. यामध्ये मुंबईचे कोच मार्क बाऊचर देखील उभे आहेत. नवा कर्णधार हार्दिक आणि माजी कर्णधार रोहितही त्यात दिसतायत. यावेळी हार्दिकने रोहितला पाहताच तो त्याला भेटायला गेला. रोहितला आधी हँडशेक करायचा होता पण हार्दिकने थेट त्याला मिठी मारली.

रोहितच्या प्रश्नावर पाळलं मौन

आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचे कोच मार्क बाऊचर आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी हार्दिक पांड्या आणि मार्क बाऊचर यांना कर्णधारपदाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र यावेळी दोघांनीही मौन पाळले. 

रोहितविषयी हार्दिक पांड्या म्हणाला, 'रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे, तो मला खूप मदत करतो. या संघाने आजवर जे काही साध्य केलंय. हे सर्व रोहितच्या नेतृत्वाखाली मिळवले आहे, मी तेच पुढे नेईन. मी माझी संपूर्ण कारकीर्द त्याच्या हाताखाली खेळली आहे आणि मला माहित आहे की तो नेहमीच माझ्या खांद्यावर असेल.

IPL 2024 साठी मुंबई इंडियन्सचा संघ - 

हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, एन. तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.