शुक्रवारपासून भारताची पर्थमध्ये परीक्षा, या खेळाडूंना संधी मिळणार?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला. 

Updated: Dec 11, 2018, 09:33 PM IST
शुक्रवारपासून भारताची पर्थमध्ये परीक्षा, या खेळाडूंना संधी मिळणार? title=

ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला. याचबरोबर भारतानं ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतली. ७० वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतानं ऑस्ट्रेलियामध्ये पहिली टेस्ट मॅच जिंकली आहे. यानंतर आता पर्थमध्ये शुक्रवारी १४ डिसेंबरपासून दुसरी टेस्ट पर्थमध्ये सुरु होणार आहे. पण पर्थच्या जुन्या नाही तर नवीन मैदानामध्ये ही मॅच होईल. पर्थच्या जुन्या मैदानातील खेळपट्टी ही फास्ट बॉलरसाठी अनुकूल होती. तशाचप्रकारे नवीन मैदानातली खेळपट्टीही फास्ट बॉलरना मदत करेल, असं बोललं जातंय. भारतीय टीमही जलद खेळपट्टीला अनुसरूनच सराव करत आहे.

दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचे फास्ट बॉलर कडवं आव्हान देतील हे विराटलाही माहिती आहे. पण खेळपट्टी फास्ट बॉलरला अनुकूल असेल तर भारताचे फास्ट बॉलरही ऑस्ट्रेलियाला तगडं आव्हान देतील.

बॅटिंगच्या दृष्टीकोनानं बघितलं तर पहिल्या टेस्टमध्ये मोठी खेळी करू न शकलेला विराट कोहली पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येण्यासाठी मैदानात उतरेल. तर पहिल्या टेस्टमध्ये विजयाचा शिल्पकार ठरलेल्या चेतेश्वर पुजाराला लवकर आऊट करण्याचं आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलरपुढे असेल.

विराटच्या वेगळ्या चिंता

भारताचा कर्णधार विराट कोहलीला मात्र वेगळीच चिंता सतावत असेल. ऍडलेडमध्ये भारत ४ बॉलर घेऊन मैदानात उतरला होता. यामध्ये ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे ३ फास्ट बॉलर आणि आर.अश्विन हा एकमेव स्पिनर होते. पण पर्थची खेळपट्टी जलद असेल तर मात्र विराटला वेगळा विचार करणं भाग पडू शकतं.

सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या रोहित शर्माला टीममध्ये ठेवायचं का नाही हा प्रश्नही विराटपुढे असणार आहे. पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये रोहित शर्मा चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही बेजबाबदार शॉट मारून आऊट झाला. आधीच्या बॉलला सिक्स मारल्यानंतर पुन्हा एकदा रोहित सिक्स मारायला गेला, यामध्ये तो कॅच आऊट झाला. रोहितच्या या खेळीवर माजी क्रिकेटपटूंनीही टीका केली होती.

पर्थची खेळपट्टी बघता विराट कोहली ५ बॉलरना घेऊन मैदानात उतरणार असेल तर मात्र रोहित शर्माला टीमबाहेर राहावं लागू शकतं. पण भारतीय बॅट्समनचा फॉर्म बघता विराट कोहली हा जुगार खेळणार नाही असंच दिसतंय.

पृथ्वी शॉची सरावाला सुरुवात

क्रिकेट ऑस्ट्रेलिया-११ विरुद्धच्या सराव सामन्यामध्ये पावलाला दुखापत झाल्यामुळे पृथ्वी शॉला पहिल्या टेस्टला मुकावं लागलं होतं. पण ऍडलेड टेस्टच्या शेवटच्या दिवशी शॉनं सरावाला सुरुवात केली आहे. ऍडलेडच्या मैदानात शॉनं कवायत केली. पण पृथ्वी शॉ पर्थच्या टेस्टमध्ये पूर्णपणे फिट व्हायची शक्यता कमी आहे. मेलबर्नमध्ये २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या टेस्टमध्ये शॉ खेळू शकतो. त्यामुळे दुसऱ्या टेस्टमध्ये भारत टीममध्ये कोणतेही बदल करणार नाही, अशीच शक्यता आहे.

पहिल्यांदाच या मैदानात मॅच होणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही दुसरी टेस्ट पर्थमधल्या नेहमीच्या वाका मैदानात होणार नसून ऑप्टिस या मैदानात होणार आहे. आत्तापर्यंत झालेल्या वनडे आणि टी-२० मॅचमध्ये वाकाच्या खेळपट्टीप्रमाणेच ही खेळपट्टीही जलद होती.

भारताची संभाव्य टीम

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेट कीपर), रोहित शर्मा, आर. अश्विन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह