इंग्लंडला ऑल आऊट केल्यानंतर भारतीय बॅट्समनची चांगली सुरुवात

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारताचा वरचष्मा राहिला.

Updated: Aug 30, 2018, 11:14 PM IST
इंग्लंडला ऑल आऊट केल्यानंतर भारतीय बॅट्समनची चांगली सुरुवात title=

साऊथॅम्पटन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारताचा वरचष्मा राहिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं एकही विकेट न गमावता १९ रन केले होते. लोकेश राहुल ११ रनवर नाबाद तर शिखर धवन ३ रनवर नाबाद खेळत होता. इंग्लंडचा २४६ रनवर ऑल आऊट केल्यानंतर ४ ओव्हरसाठी भारतीय टीम बॅटिंगला आली. पण जेम्स अंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडला भारताला एकही धक्का देता आला नाही.

त्याआधी पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडचा २४६ रनवर ऑल आऊट झाला आहे. सॅम कुरननं केलेल्या संघर्षामुळे इंग्लंडला एवढी मजल मारता आली. इंग्लंडची एकवेळची अवस्था ८६-६ अशी झाली होती. पण कुरन आणि मोईन अलीनं इंग्लंडच्या इनिंगला आकार दिला. सॅम कुरन १३६ बॉलमध्ये ७८ रन करून सगळ्यात शेवटी आऊट झाला. तर मोईन अलीनं ८५ बॉलमध्ये ४० रन केले. भारताकडून जसप्रीत बुमराहनं ३ विकेट घेतल्या तर ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि आर.अश्विनला प्रत्येकी २ विकेट मिळाल्या. हार्दिक पांड्याला १ विकेट घेण्यात यश आलं.

या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्याच्या चांगलाच अंगलट आला होता. अखेर कुरन आणि मोईन अलीनं इंग्लंडची पडझड थांबवली.

५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमधल्या सुरुवातीच्या २ टेस्ट भारतानं गमावल्या होत्या. तर तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा शानदार विजय झाला होता. या सीरिजमध्ये इंग्लंड २-१नं आघाडीवर आहे. त्यामुळे सीरिजमधलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर भारताला ही मॅच जिंकावीच लागणार आहे.

स्कोअर बोर्ड पाहण्यासाठी क्लिक करा