विराटच्या दमदार शतकामुळे भारताचा दणदणीत विजय

भारताचा दुसऱ्या वनडेत शानदार विजय

Updated: Jan 15, 2019, 05:31 PM IST
विराटच्या दमदार शतकामुळे भारताचा दणदणीत विजय title=

एडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्द तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामान्यात ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भारताने या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. भारताच्या या विजयामुळे भारताचं मालिकेतील आव्हान कायम आहे. कोहलीच्या शतकी कामगिरीमुळे आणि धोनीच्या शेवट पर्यंत टिकून राहिल्यामुळे भारताला हा विजय मिळवता आला. भारताने या मैदानावर एकूण १५ सामने खेळले आहेत. भारतीय संघाचा हा एडलेड वरील नववा विजय ठरला आहे. त्यापैकी भारताला ५ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला तर एक सामना अनिर्णित राहिला.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २९९ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली राहिली नाही. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या शिखर धवनला या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली. पण त्याला आपल्या खेळीत सातत्य ठेवता आले नाही. रोहित शर्मा-शिखर धवनने पहिल्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. भारताची पहिली विकेट शिखर धवनच्या रुपात गेली. धवन ३२ धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या कर्णधार कोहलीने मैदानात स्वत:ला सेट करुन घेतले. सलामीवीर रोहित सोबत कोहलीने दुसऱ्या विकेट्साठी ५४ धावा जोडल्या. भारताची धावसंख्या १०१ असताना भारताला दुसरा झटका लागला. रोहित शर्माने ४३ धावा केल्या. सलामीवीर रोहितने चांगली खेळी केली. पण त्याला सुद्धा जास्त वेळ मैदानात टिकता आले नाही. 

रोहित बाद झाल्यानंतर आलेल्या अंबाती रायडूच्या कामगिरीवर क्रिकेटचाहत्यांचे लक्ष होते. पहिल्या सामन्यात भोपळा न फोडणाऱ्या रायडूने कोहलीला उत्तम साथ दिली. कोहली-रायडूमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी झाली. पण रायडूने क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. रायडू २४ धावांवर झेलबाद झाला. नियमित अंतराने विकेट जात असताना कर्णधार कोहली एकटा खिंड लढवत होता. रायडूनंतर आलेल्या धोनीने कोहलीला चांगली साथ दिली. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ८२ धावांची पार्टनरशिप झाली. या दरम्यान कोहलीने शतक झलकावले. कोहलीच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही ३९ वे शतक आहे. कोहलीने एकूण ११२ बॉलमध्ये ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. कोहली १०४ धावांवर बाद झाला. पण त्याच्या या शतकीय खेळीमुळे भारताचा विजय जवळपास निश्चित झाला होता.

कोहली बाद झाल्यानंतर आता दिनेश कार्तिक आणि धोनीने भारताच्या विजयावर मोहर लावली. धोनीने नाबाद ५५ धावांची मह्त्त्वपूर्ण खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. यात त्याने २ षटकार लगावले. तर दिनेश कार्तिकने नाबाद २५ धावा केल्या. हा सामना जिंकल्यानंतर तीन सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे.

आधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला २९९ धावांचं तगडं आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाने ९ विकेट गमावत २९८ धावा केल्या. शॉन मार्शच्या १३१ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला २९८ धावांचा आकडा गाठता आला. शॉन मार्शला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगली साथ देता आली नाही. केवळ ग्लेन मॅक्सवेलने ४८ धावा केल्या. तर गोलंदाजी करतान सर्वात जास्त विकेट भुवनेश्वर कुमारने ४ विकेट घेतले. तर मोह्म्मद शमीने ३ विकेट घेतले.