अस्सल मातीतील खेळांना आपल्या अस्तित्वासाठी लढा

क्रिकेट या विदेशी खेळाला भारतात अतिलोकप्रियता आणि प्रेम मिळतं. याउलट आपल्या देशी आणि अस्सल खेळांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.

Updated: Dec 16, 2017, 08:32 PM IST
अस्सल मातीतील खेळांना आपल्या अस्तित्वासाठी लढा  title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : क्रिकेट या विदेशी खेळाला भारतात अतिलोकप्रियता आणि प्रेम मिळतं. याउलट आपल्या देशी आणि अस्सल खेळांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.

या देशी खेळांची लोकप्रियता वाढावी यासाठी काही क्रीडाप्रेमी झटताहेत. मात्र, त्यांना संबंधित आणि ऑलिम्पिक संघटनेची मान्यता मिळवणं कठीण असल्यानं या खेळांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. याबाबतचा हा रिपोर्ट...

आट्यापाट्या, लंगडी, विट्टी-दांडू, लगोरीसारखे देसी खेळ आपल्याला जवळचे वाटतात. मात्र, या खेळांना लोकप्रियता आणि प्रतिष्ठा नाही. याचबरोबर या खेळांमध्ये पैसाही नाही. या खेळांकडे आजही केवळ मनोरंजनाच्या दृष्टीकोनातूनच पाहिलं जातं. याच कारणांमुळे या अस्सल मातीतील खेळांना आपल्या अस्तित्वासाठी झगडावं लागतंय. 

काही क्रीडाप्रेमी आपले हे देशी खेळ वाचव्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी धडपडतायत. यातील अनेक खेळांची संघटना स्थापन करण्यात आली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवल्या जातात. मात्र, या खेळांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी सर्वात आधी अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाची मान्यता असणं गरजेचं असणं. यानंतर ऑलिम्पिक संघटनेची मान्यता मिळावी लागले. तरच खेळ जागतिक पातळीवर पोहचू शकतो. मात्र, यामध्ये संघटकांच्या प्रयत्नांना यश येत नसल्याचं दिसून येतंय.

पारंपरिक कुस्ती, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टिंगसह २७ लोकप्रिय नसलेल्या खेळांना शालेय स्तरावरील स्पर्धेतून वगळण्याचा निर्णयही नुकताच राज्य सरकारनं घेतलाय. याबाबत क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी काहीही बोलण्यास नकार दिलाय.

या २७ खेळांमधील तीन-चार खेळ आपल्या मातीतील असून या निर्णयाचा फटका या खेळांनाही बसणार आहे. तर काही क्रीडा तज्ज्ञांच्या मते केवळ संघटना स्थापन करुन आणि स्पर्धा भरवून हे खेळ काही जागतिक पातळीवर पोहचणार नाहीत. यासाठी देशी खेळांचा पाया विस्तृत करावा लागेल. स्पर्धांचा दर्जा उंचवण्याचं आणि देशी खेळांचं मार्केटींग करण्याचं आव्हान संबंधिक क्रीडा संघटकांना पेलावं लागणार आहे.

कोणत्याही खेळाला राजाश्रय मिळाला की तो खेळ मोठा होतो. म्हणूनच या देशी खेळांसाठी सरकारनंही पाठिंबा दिला पाहिजे असं संघटकांचं म्हणणं आहे. यासाठी आता क्रीडामंत्री पुढाकार घेणार का ? असा प्रश्न क्रीडावर्तुळात विचारला जातोय.

दरम्यान आपल्याला या देशी खेळांबाबत मनातून जरी आपुलकी वाटत असली तरी प्रत्यक्षात हे खेळ टीकवण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी खूप झटावं लागणार एवढं मात्र नक्की...