IndvsNz : ३५ धावांनी सामना जिंकत भारताने किंवींना नमावले

या विजयामुळे भारताने ४-१ अशा फरकाने मालिका जिंकली आहे.

Updated: Feb 3, 2019, 03:43 PM IST
 IndvsNz :  ३५ धावांनी सामना जिंकत भारताने किंवींना नमावले title=

वेलिंग्टन : न्यूझीलंड विरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताचा ३५ धावांनी विजय झाला आहे. भारताने विजयासाठी दिलेल्य २५३ धावांच पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंडचा संघ २१७ धावांवर गारद झाला. या विजयामुळे भारताने ४-१ अशा फरकाने मालिका जिंकली आहे.

 

२५३ धावांचे विजयी लक्ष गाठण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडचा पहिला विकेट १८ धावांवर गेला. हेन्री निकोल्सला मोहम्मद शमीला ८ धावांवर बाद केले. त्यानंतर कुलीन मुनरो आणि वनडाऊन आलेल्या कर्णधार केन विलियमसन मध्ये भागीदारी होत असतानाच न्यूझीलंडलची धावसंख्या ३७ असताना मोहम्मद शमीने दुसरा झटका दिला. शमीने कुलीन मुनरोला २४ धावांवर बोल्ड केले. दुसऱ्या विकेट गेल्यानंतर काही क्षणात रॉस टेलर १ धाव करुन आऊट झाला. त्याला हार्दिक पांड्याने पायचीत केले. यामुळे न्यूझीलंडची परिस्थिती ३ बाद ३८ अशी झाली.

टेलर बाद झाल्यानंतर चौथ्या विकेटसाठी केन विलियमसन आणि टॉम लेथम यांच्यात ६७ धावांची भागदारी झाली. या जोडीला तोडण्यास पार्ट टाईम स्पिनर केदार जाधवला यश आले. केदारने विलियमसनला ३९ धावांवर शिखर धवनच्या हाती कॅच आऊट केले. यानंतर नियमित अंतराने भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला झटके देण्यास सुरुवात केली. चौथ्या विकेटसाठी केलेल्या भागीदारीचा अपवाद वगळता कोणत्याच जोडीला अर्धशतकी भागीदारी करता आली नाही. न्यूझीलंडकडून सर्वाधिक ४४ धावा या जेम्स नीशाम यांने केला. कर्णधार केन विलियमसन ने ३९ धावा तर टॉम लेथमने ३७ धावा केल्या.

भारताकडून सर्वाधिक ३ विकेट युझवेंद्र चहालने घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी १ विकेट घेतली.      

रायडु- शंकरने डाव सावरला

याआधी नाणेफेक जिंकून फलंदाजी करायला आलेल्या भारतीय संघाची निराशाजनक सुरुवात झाली. भारताची पहिली विकेट ८ धावांवर गेली. कर्णधार रोहित शर्मा केवळ २ धावा करुन बाद झाला. त्यापाठोपाठ शिखर धवन ६ धावा करुन बाद झाला. धवन आऊट झाला तेव्हा भारताची धावसंख्या १२ होती. भारताचे सलामीवीर सवस्त्यात माघारी गेले. धवन बाद झाल्यानंतर नवखा शुभमन गिलदेखील ७ धावा करुन बाद झाला. चौथ्या सामन्यात पुनरागमन केलेल्या धोनीने गिल बाद झाल्यानंतर मैदानात आला. गेल्या अनेक सामन्यांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या धोनीला या सामन्यात चांगली कामगिरी करण्यास अपयश आले. धोनी बोल्ट च्या गोलंदाजीवर अवघी १ धाव करुन बोल्ड झाला.

यानंतर आलेल्या विजय शंकर आणि अंबाती रायुडुने भारताचा डाव सावरला. या दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी झाली. या दोघांच्या भागीदारीने भारतीय खेळीचा पाया रचला. भारताचा पाचवा विकेट ११६ धावांवर गेला. विजय शंकर ४५ धावा करुन रनआऊट झाला. यानंतर आलेल्या केदार जाधवने चांगली खेळी करत रायडुला उत्तम साथ दिली. सहाव्या विकेटसाठी रायडु-जाधव यांच्यात ७४ धावांची भागीदारी झाली. भारताची धावसंख्या १९० असताना रायडु बाद झाला. त्याने ९० धावांची खेळी केली. यानंतर  काही वेळाने केदार जाधव देखील बाद झाला. त्याने ३४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने धमाकेदार खेळी केली. पांड्याने २२ बॉलमध्ये ४५ धावांची विस्फोटक खेळी केली. यात त्याने ५ सिक्स तर २ चौकार लगावले. पांड्याच्या या खेळीमुळे  न्यूझीलंडला २५३ धावांचे आव्हान देता आले. 

न्यूझीलंडकडून सर्वाधिक ४ विकेट मॅट हेन्री याने घेतल्या. तर ट्रेंट बोल्टने ३ आणि जेम्स निशानने १ विकेट घेतला.