IPL 2019 | संगकाराला मागे टाकत ऋषभ पंतचा नवा रेकॉर्ड

पंत आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. 

Updated: Apr 30, 2019, 04:39 PM IST
IPL 2019 | संगकाराला मागे टाकत ऋषभ पंतचा नवा रेकॉर्ड title=

दिल्ली : स्टंपच्या मागून बॅट्समनसोबत मजेदार स्लेजिंग करणारा भारताचा खेळाडू ऋषभ पंतने आयपीएलच्या 12 व्या म्हणजेच यंदाच्या पर्वात नवा रेकॉर्डब्रेक केला आहे. त्याने कुमार संगकाराचा रेकॉर्ड मोडित काढला आहे. एक विकेटकीपर म्हणून पंतने हा रेकॉर्ड केला आहे.

बंगळुरु विरुद्ध रविवारी (28 एप्रिल) झालेल्या मॅचदरम्यान पंतने हा विक्रम आपल्या नावे केला. या मॅचमध्ये त्याने 2 कॅच घेत कुमार संगकाराचा रेकॉर्ड मोडला आहे. पंतने हेन्री क्लासेन आणि गुरकिरत मन सिंगची कॅच घेतली. यासह पंतच्या एका पर्वात कीपर म्हणून 20 विकेट पूर्ण झाल्या आहेत. या मध्ये 15 कॅचआऊट तर 5 स्टंपिंगचा समावेश आहे.

 

 

कुमार संगकाराने 2011 साली डेक्कन चार्जर्स  (आताचे हैदराबाद) टीमकडून खेळताना त्याने 19 विकेट घेतल्या होत्या. यामध्ये 17 कॅचआऊट तर 2 स्टंपिग केल्या होत्या.

दरम्यान दिल्लीने टॉस जिंकून आधी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने २० ओव्हरमध्ये १८७ रन केल्या. बंगळुरुला विजयासाठी १८८ रनचे आव्हान दिले. परंतु बंगळुरुला फक्त १७१ रनच करता आल्या. यामुळे मॅचमध्ये दिल्लीचा १५ रनने विजय झाला. या विजयासोबत दिल्ली प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारी दुसरी टीम ठरली.

प्ले-ऑफच्या प्रवेशासाठी फार चुरस पाहायला मिळत आहे. दिल्ली आणि चेन्नई टीम प्लेऑफमध्ये आधीच पोहोचल्या आहेत. आता प्ले-ऑफसाठी फक्त दोन जागाच आहेत. आणि २ जागांसाठी चक्क ५ टीम आपली दावेदारी ठोकून आहेत. परंतु या ५ पैकी मुंबईचा अपवाद वगळता पंजाब. हैदराबाद, राजस्थान आणि कोलकाता या टीममध्ये टक्कर असणार आहे. त्यामुळे प्ले-ऑफमध्ये कोणती टीम येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ऋषभ पंतला वर्ल्ड कपच्या टीममध्ये स्थान मिळाले नाही. असे असले तरी पंत आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. पंत यंदाच्या पर्वात १२ सामने खेळला आहे. यात त्याने  १६१ च्या स्ट्राईक रेटने ३४३ रन केल्या आहेत. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे.