एका युगाचा शेवट! एमएस धोनीच्या कर्णधारपद सोडण्यामागे नेमकं कारण काय? हे कसले संकेत?

IPL 2024 : आयपीएलचा सतरा हंगाम सुरु होण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला असतानाच क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली. महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला. आता चेन्नईची कमान युवा ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे. 

राजीव कासले | Updated: Mar 21, 2024, 07:13 PM IST
एका युगाचा शेवट! एमएस धोनीच्या कर्णधारपद सोडण्यामागे नेमकं कारण काय? हे कसले संकेत? title=

MS Dhoni Step Down as CSK Captain : आयपीएलच्या सतराव्या हंगामाला काही तासांचाच अवधी राहिलाय. देशभरातील क्रिकेट चाहत्याना पुढचे दोन महिने रंगतदार आणि चुरशीच्या सामन्यांची मेजवाणी मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) दरम्यानच्या सामन्याने आयपीएल 2024 ला सुरुवात होईल. पण त्याआधीच क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे. युवा ऋतुराज गायकवाडकडे (Ruturaj Gaikwad) चेन्नईची कमान सोपवण्या आली आहे. 

हे कसले संकेत?
याआधी 2022 च्या हंगमात एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपण्यात आलं. पण जडेचाच्या नेतृत्वाखाली चेन्नईची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही. त्यामुळे हंगामाच्या मध्यावरच धोनीवर पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. आता पुन्हा एकदा एमएस धोनीने कर्णधारपद सोडलं आहे. पण यावेळी वेगळेच संकेत मिळतायत. 

एमएम धोनीने अचानक घेतलेल्या या निर्णयाने चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधला सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून एमएस धोनीची गणना होते. आयपीएलच्या गेल्या हंगामात धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. या हंगामातही तोच संघाचं नेतृत्व करणार असं वाटत असतानाच अचानक धोनीने कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. अशात धोनी हा निर्णय का घेतला असा प्रश्न उपस्थित होतोय?

2008 पासून धोनी आयपीएलसोबत
2008 मध्ये आयपीएलच पहिला हंगाम खेळवण्यात आला. त्यावेळी 8 संघांचा समावेश होता. यात चेन्नई सुपर किंग्स हा एक संघ होता. चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा एमएस धोनीकडे सोपवण्यात आली. तेव्हापासून गेल्या हंगामापर्यंत म्हणजे तब्बल 16 हंगाम धोनी चेन्नईचा कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तब्बल पाचवेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं.

अचानक का घेतला निर्णय?
2023 च्या हंगामात धोनीच्या नेृत्वात चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आणि मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक विजेतेपदाशी बरोबरी केली. यावेळी सहावं जेतेपद पटकावंत मुंबई इंडियन्सच्या एक पाऊल पुढे जाण्याच्या इराद्याने चेन्नई मैदानात उतरणार होती. पण त्याआधीच संघाला आणि चाहत्यांनाही धक्का बसला. कदाचित धोनीचा हा शेवटचा हंगाम असल्याचा कयास लावला जात आहे. 

धोनीचा शेवटचा आयपीएल?
2022 मध्ये रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर तेव्हाच धोनीचा हा शेवटचा आयपीएल असल्याचं बोललं जात होतं. पण त्या हंगामात चेन्नईची कामगिरी चांगली न झाल्याने पुन्हा एकदा धोनीने सर्व सूत्र आपल्या हाती घेतली. धोनीचं चेन्नईचा संघ, चाहते आणि या शहराशी खास नातं जोडलं गेलं आहे. पण या हंगामाच्या सुरुवातीलाच धोनीचा उत्तराधिकारी कोण असेल, यावरुन चर्चा सुरु झाली होती. ही चर्चा अखेर ठरलीय. ऋतुराज गायकवाडला धोनीचा उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात आलंय. 

आपीएलचा हा हंगाम कदाचित धोनीचा शेवटचा हंगाम असू शकतो. धोनी गुडघ्याच्या दुखण्याने त्रस्त आहे. तसंच यंदाच्या आयपीएलमधला तो सर्वात वयस्क खेळाडू आहे. धोनीचं वय 40 आहे. अशात कुठेतरी थांबण्याचा निर्णय त्याला कधी ना कधी घ्यावाच लागणार आहे. कदाचित याची सुरुवात त्याने कर्णधारपदापासून सुरु केली असावी.