IPL 2024: 'माझा मुलगा गेल्या 2 वर्षांपासून फक्त...', मयांक यादवच्या आईचा खुलासा

IPL 2024: मयांक यादवने आपल्या जबरदस्त गोलंदाजीने आयपीएलमध्ये खळबळ माजवली असून, सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. दरम्यान आपला मुलगा 100 टक्के भारतीय संघात स्थान मिळवेल असा विश्वास त्याचा आई-वडिलांनी व्यक्त केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 4, 2024, 03:24 PM IST
IPL 2024: 'माझा मुलगा गेल्या 2 वर्षांपासून फक्त...', मयांक यादवच्या आईचा खुलासा title=

IPL 2024: लखनऊ सुपरजायंट्सचा जलदगती गोलंदाज मयांक यादवने आपल्या जबरदस्त गोलंदाजीने आयपीएलमध्ये खळबळ उडवून दिली आहे. तब्बल ताशी 150 किमीने चेंडू टाकत त्याने संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. यानंतर क्रिकेटचाहते त्याच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. त्याच्या जलद गोलंदाजीचं रहस्य काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. मयांक यादवच्या आईला त्याच्या खाण्याच्या सवयींबद्दल विचारण्यात आलं असता तो गेल्या काही वर्षांपासून शाकाहारी झाल्याचं म्हटलं. पण तो आधी मांसाहार करायचा असा खुलासाही त्यांनी केला. 

"मयांक नुकताच शाकाहारी झाला आहे. आधी तो मांसाहरही करत होता. तो गेल्या 2 वर्षांपासून फक्त शाकाहारी अन्न सेवन करत आहे. तो आपल्या डाएट चार्टच्या आधारे आम्हाला जे काही बनवायला सांगत होता, ते आम्ही बनवत होतो. तो काहीच विशेष खात नव्हता. डाळ, रोटी, भात, दूध, भाज्या इतकंच..," अशी माहिती त्याच्या आईने दिली.

दरम्यान मयांकने मांसाहार करणं का सो़डलं याची नक्की माहिती त्याच्या आईकडे नाही. पण यामागे दोन कारणं असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. पहिलं म्हणजे त्याची श्रीकृष्णावर फार श्रद्धा आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्या शरिराला मांसाहार जमत नव्हता. "मांसाहार आपल्याला शरिराला जास्त योग्य नसल्याचं त्याने सांगितलं होतं. त्याने आम्हाला दोन कारणं सांगितली होती. पहिलं म्हणजे त्याची श्रीकृष्णावर श्रद्धा बसू लागली होती. हे एक कारण असू शकतं. मांसाहार करणं का सोडलं याची माहिती देण्यासाठी आम्ही त्याच्यावर दबाव टाकला नाही. आपण जे काही करत आहोत ते शरीर आणि खेळासाठी चांगलं असल्याचं त्याचं म्हणणं होतं," अशी माहिती त्याच्या आईने दिली आहे. 

यावेळी ममता यादव यांनी आपल्या मुलाला लवकरच भारतीय संघात संधी मिळेल आणि तो भारतीय संघाच्या जर्सीत खेळताना दिसेल असा विश्वास व्यक्त केला आहे. "होय हे माझ्या मनात आहे, 100 टक्के मला आशा आहे की तो भारतीय संघात पदार्पण करेल आणि चांगली कामगिरी करेल. पण माझ्यापेक्षा त्याच्या वडिलांना 100 टक्के खात्री आहे. सध्या लोक तो भारतासाठी खेळला पाहिजे असं म्हणत आहेत. पण गेल्या दोन वर्षांपासून त्याचे वडील सांगत आहेत की जर तो जखमी झाला नसता तर तो आगामी टी-20 विश्वचषकासाठी गेला असता,” मयंकच्या आईने सांगितले.

मयांकची आयपीएलमधील कामगिरी पाहता अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याला भारतीय संघात स्थान दिलं जावं असं मत मांडलं आहे. काहींनी त्याला टी-20 वर्ल्डकप संघात संधी द्यावी असं म्हटलं आहे. जून महिन्यापासून टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे.