IPL 2024: रोहित शर्माने काय चुकीचं केलं आहे? नवज्योत सिंग सिद्धू संतापले, 'हे पचवणं थोडं...'

IPL 2024: मुंबई इंडियन्स संघाला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पुन्हा एकदा हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावरुन नाराजी जाहीर केली जात आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 2, 2024, 02:07 PM IST
IPL 2024: रोहित शर्माने काय चुकीचं केलं आहे? नवज्योत सिंग सिद्धू संतापले, 'हे पचवणं थोडं...' title=

IPL 2024: मुंबई इंडियन्स संघाला आयपीएलच्या सध्याच्या हंगामात विजयाची प्रतिक्षा आहे. मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याविरोधातील रोष आणखीनच वाढला आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आल्याने मुंबई इंडियन्सचे चाहते आधीच नाराज असून त्याला ट्रोल करत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटर आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू यांनी करोडो चाहत्यांच्या भावनेशी सहमती दर्शवत रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवण्याइतपत त्याने काय चुकीचं केलं आहे? अशी विचारणा केली आहे. रोहित शर्मा अद्यापही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असून, हार्दिक पांड्याकडे आयपीएल संघाचं नेतृत्व आहे. 

"आपल्या भारतीय संघाचा कर्णधार, भारताचा हिरो हा मुंबईचा कर्णधार नाही ही गोष्ट कोणीही पचवू शकत नाही. त्याने काय चुकीचं केलं आहे? असा विचार मुंबई इंडियन्सचे चाहते करत असतील," असं नवज्योत सिंग सिद्धू स्टार स्पोर्टसशी बोलताना म्हणाले आहेत. 

पुढे ते म्हणाले की, "पण त्याने आता नेमकं काय करायला पाहिजे? यशाशी तुलना होऊ शकणारं दुसरं काहीही नाही. जर त्याने सामने जिंकले असते तर त्याच्यावर होणारी टीकाही कमी झाली असती". 

यादरम्यान, हार्दिक पांड्याला बढती देत भारतीय संघाच्या टी-20 संघाचा कर्णधार केलं जाणार असल्याचीही चर्चा रंगली होती. पण बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी रोहित शर्माच भारतीय संघाचा कर्णधार राहील आणि जून महिन्यात सुरु होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप संघाचं नेतृत्व करेल असं स्पष्ट केलं आहे. 

नवज्योत सिंग सिद्धू यांचं म्हणणं आहे की, जर बीसीसीआयने आधीच रोहित शर्माच्या नावाची घोषणा केली असती तर कदाचित मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा निर्णय घेतला नसता. ते म्हणाले आहेत की, "जर भारताने ऑक्टोबर महिन्यातच रोहित शर्मा टी-20 वर्ल्डकप संघाचा कर्णधार असेल असं जाहीर केलं असतं तर कदाचित हार्दिक पांड्याला कर्णधार केलं नसतं. कारण भारतीय संघाचा कर्णधार आहे त्याला कसं हटवायचं असा विचार मुंबईने केला असता".

मुंबईचा सलग तिसरा पराभव

आयपीएच्या 14 व्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने 27 बॉल आणि 6 विकेट्स राखून मुंबई इंडियन्सच्या संघाला घरच्या मैदानावर धूळ चारली. यासह राजस्थानने सलग तिसरा सामना जिंकला. तर मुंबईने मात्र लाजिरवाणी कामगिरी करत सलत तिसरा पराभव नोंदवला. मुंबईने 3 सामने गमावले असून गुणतालिकेत तळाशी आहे. दुसरीकडे तिसऱ्या विजयासहीत संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानच्या संघाने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 ओव्हर्समध्ये लगावत 125 धावा केल्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने 27 चेंडू आणि 6 गडी राखून आव्हान पूर्ण केले. मुंबईने पहिल्या 4 विकेट्समध्ये केवळ 20 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा, नमन धीर, देवाल्ड ब्रेविस यांना खातंही उघडता आलं नाही. हार्दिक पांड्याने 21 चेंडूत 6 चौकारांसह 34 धावा केल्या.