'तुझ्यासाठी एवढं...', जान्हवी समजून आर अश्विनने भलत्याच तरुणीशी मारल्या गप्पा, चूक लक्षात येताच म्हणाला 'अरे...'

IPL 2024: भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने एक्सवर जान्हवी कपूर समजून तिच्या बनावट खात्याशी संवाद साधला. त्याच्या चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे याआधीही आर अश्विनने या खात्याशी संवाद साधला होता.  

शिवराज यादव | Updated: Mar 21, 2024, 04:03 PM IST
'तुझ्यासाठी एवढं...', जान्हवी समजून आर अश्विनने भलत्याच तरुणीशी मारल्या गप्पा, चूक लक्षात येताच म्हणाला 'अरे...' title=

IPL 2024: आयपीएल स्पर्धा सुरु होण्यासाठी आता अवघे काही क्षण उरले आहेत. 22 मार्चला एम चिन्नास्वामी स्टेडिअमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पहिला सामना होणार आहे. या सामन्याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. फक्त सर्वसामान्य क्रिकेट चाहतेच नाही तर सेलिब्रिटींनाही या सामन्याला उपस्थित राहण्याची इच्छा आहे. पण आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी तिकिटांची मागणी इतकी आहे की, ते मिळवणं अनेकांसाठी कठीण झालं आहे. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली आमने-सामने असल्याने तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येकजण सर्वेतोपरी प्रयत्न करत आहे. आपणही या क्षणाचा साक्षीदार व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. 

सामन्याची तुफान चर्चा सुरु असताना आऱ अश्विनच्या एक्स अकाऊंटवरील चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. आर अश्विनने एक्सवरुन जान्हवी कपूरशी संवाद साधला होता. पण हे व्हायरल झालं आहे, कारण हे अकाऊंट जान्हवी कपूरचं नव्हे तर तिच्या नावे बनावट खातं आहे. 

जान्हवी कपूरच्या बनावट अकाऊंटवरुन आर अश्विनचे आभार मानण्यात आले होते. चेन्नई विरुद्ध बंगळुरु सामन्याचं तिकीट मिळवून दिल्याबद्दल या अकाऊंटवरुन आभार मानले होते. या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं की, "चेन्नई विरुद्ध बंगळुरु सामन्याचे बॉक्स तिकीट मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद अश्विन. चेपॉकमध्ये थाला आणि किंगला एकत्र पाहण्याचा आनंद मिळेल".

विशेष म्हणजे या मेसेजवर आर अश्विननेही उत्तर दिलं. "किमान इतकं तर करु शकतो", असं आर अश्विनने म्हटलं. तसंच तू या बदल्यात मला जी स्टँड तिकीट पाठवू शकतेस असंही त्याने लिहिलं होत.

आर अश्विनने जान्हवी कपूरच्या बनावट खात्याशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने साधलेल्या संवादाचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते. एका नेटकऱ्याने त्याला हे बनावट खातं असल्याचं लक्षात आणून दिलं होतं. यानंतर त्याने आश्चर्य व्यक्त केलं होतं. 

आर अश्विन भारताच्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी आहे. पण इतका मोठा क्रिकेटर असतानाही त्यालाही तिकीट मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. आर अश्विनचा चेन्नईचा रहिवासी आहे. तिथेच आयपीएलचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या तिकीटांसाठी असणारी मागणी पाहून आर अश्विनही आश्चर्यचकीत झाला आहे. माझ्या मुलांनाही हा सामना पाहायचा असून, मदत करा अशी पोस्ट त्याने एक्सवर शेअर केली होती.