रोहित मुंबईच्या संघापासून एकटाच वेगळा राहतोय! खुलासा करत म्हणाला, 'मुंबईचे शेवटचे..'

Rohit Sharma Is not Staying With Mumbai Indians: रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यामध्ये वाद सुरु असल्याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे, असं असतानाच रोहितने तो संघाबरोबर राहत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 21, 2024, 10:58 AM IST
रोहित मुंबईच्या संघापासून एकटाच वेगळा राहतोय! खुलासा करत म्हणाला, 'मुंबईचे शेवटचे..' title=
रोहितनेच केला खुलासा (फोटो सौजन्य - एपी)

Rohit Sharma Is not Staying With Mumbai Indians:  इंडियन प्रिमिअर लीगच्या 17 व्या पर्वाला म्हणजेच आयपीएल 2024 ला सुरुवात होण्याआधीपासूनच मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये फूट पडली असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र त्यावर वेळोवेळी सूचक पद्धतीने संघाने स्पष्टीकरण दिलं. असं असतानाच आता मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने तो आयपीएल स्पर्धेत मुंबई होणाऱ्या सामन्यादरम्यान संघाबरोबर राहत नसल्याचा खुलासा केला आहे. मागील चारही सामने मुंबईचा संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्येच खेळला आहे. त्याच सामन्यांदरम्यान रोहित त्याच्याच घरी थांबला होता.

एक तास आधी निघतो

वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या मुंबईतील होम मॅचेस म्हणजेच घरच्या मैदानांवरील सामन्यांमध्ये आपण घरीच राहतो असं रोहितने सांगितलं आहे. याचा फायदा आपल्याला होत असल्याचं सांगताना कुठेही टीम मिटींग असेल तर तिथे जाण्यासाठी आपण एक तास आधीच निघतो, असंही म्हटलं आहे. मुंबई असताना संघाबरोबर राहण्याचा तोटा काय होतो हे ही रोहितने सांगितलं आहे.

संघाबरोबर न राहण्याचा काय फायदा होतो?

मुंबईत असताना संघाबरोबर राहिल्यास कुटुंबियांना भेटायला जाण्या-येण्यासाठीच बराच वेळ खर्च होतो असं रोहितने स्पष्ट केलं. मैदानातून घरी आणि घरुन मैदानात अशाच चकरा माराव्या लागत असल्याचं रोहित म्हणाला. "खरं तर मी घरीच राहतोय. मुंबईचे शेवटचे चार सामने इथे (वानखेडेमध्ये) झाले. त्यावेळी मी घरीच राहत होतो. संघाची मिटींग असली की केवळ तासभर आधी निघावं लागतं एवढाच काय तो फरक आहे. हे फार छान आहे. थोडं वेगळं आहे पण उत्तम आहे, असं मला वाटतं," अशी प्रतिक्रिया रोहितने नोंदवली. रोहित 'क्लब प्रेयरी फायर' नावाच्या पॉडकास्टमध्ये बोलत होता. ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर अॅडम गिलक्रीस्ट, इंग्लंडचा माजी खेळाडू मायल वॉर्न सहभागी झालेल्या या पॉडकास्टमध्ये रोहित शर्माने अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यामध्ये घरी राहण्यासंदर्भातील खुलाश्याचाही समावेश होता.

नक्की वाचा >> Sixes च्या Hat-trick ची धोनीला मोजावी लागतेये मोठी किंमत? हॉटेलमधील 'त्या' Video ने वाढली चिंता

धोनीचं कौतुक केलं...

रोहितने यावेळेस मागील रविवारी वानखेडेच्या मैदानावर झालेल्या चेन्नईविरुद्धच्या सामन्याचाही उल्लेख केला. या सामन्यात धोनीनं केलेल्या खेळीचं रोहितने कौतुक केलं. धोनीने सामन्यातील शेवटच्या 4 बॉलमध्ये 3 षटकारांच्या मदतीने 20 धावा केल्या होत्या. याच धावानंतर सामन्यातील जय-पराजयातील अंतर ठरल्या. "तो चार बॉल खेळण्यासाठी आला आणि सामन्यावर मोठा प्रभाव पाडून गेला. त्याने त्या 20-22 धावा केल्या आणि नंतर त्याच सामन्याचा निकाल लागताना निर्णायक ठरल्या," असं रोहित शर्मा म्हणाला.