IPL 2024 Dhoni Is Paying Cost Of Hattrick Of Sixes: चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने मुंबई इंडियन्सच्या संघाविरुद्धच्या वानखेडे स्टेडिमवर झालेल्या सामन्यात दमदार फटकेबाजी केली. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर धोनीने शेवटच्या 4 चेंडूंमध्ये तब्बल 20 धावा काढल्या. यामध्ये पहिल्याच 3 चेंडूंमध्ये धोनीने 3 षटकार लगावले. आपल्या पहिल्याच 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याबरोबरच धोनीच्या या कामगिरीमुळे चेन्नईला मुंबईविरुद्धच्या या सामन्यात 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. योगायोग म्हणजे चेन्नईने हा सामना 20 धावांनीच जिंकला. मात्र धोनीच्या या धडाकेबाज खेळीचे परिणाम सामन्यानंतर त्याला भोगावे लागत आहेत की काय अशी शंका आता चाहत्यांना वाटू लागली आहे. ही शंका घेण्यामागील कारण म्हणजे सामन्यानंतर धोनीचा व्हायरल झालेला एक व्हिडीओ.
मुंबई विरुद्धच्या सामन्यात 19.2 ओव्हरनंतर मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या धोनीने हार्दिकच्या गोलंदाजीवर 500 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी केली. 42 वर्षीय धोनीने केलेली फटकेबाजी पाहून मैदानातील प्रत्येकजण आवाक झाला. मात्र या सामन्यानंतर धोनीला या फटकेबाजीची मोठी किंमत मोजावी लागलीय की काय अशी शंका त्याचा हॉटेलमधील प्रवेशाचा व्हिडीओ पाहून चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर धोनी लंगडत सीएसकेचा संघ राहत असलेल्या हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर 2023 च्या आयपीएलमध्ये शेवटच्या सामन्यामध्येच धोनीच्या गुडघ्याला दुखापत जाली होती. आयपीएलचा चषक पाचव्यांदा जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धोनीने गुडघ्यांवर उपचार करण्यासाठी मुंबईत धाव घेतली होती. धोनीच्या गुडघ्यावर शस्रक्रियाही करण्यात आली होती. मुंबईविरुद्धच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे की काय अशी शंका आता त्याचा हॉटेलमधील व्हिडीओ पाहून उपस्थित केला जात आहे. मात्र यापूर्वीही धोनी यंदाच्या पर्वात गुडघ्याला पट्टी बांधून मैदानात सामन्यानंतर दिसून आला आहे. मुंबईविरुद्धच्या विजयानंतरचा हा व्हिडीओ तुम्हीच पाहा...
MS Dhoni last night at the team hotel. Man is limping but still going at it for his fans #IPL2024 #MIvsCSK pic.twitter.com/hR6JNVUsgg
— Vinesh Prabhu (@vlp1994) April 15, 2024
चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजीचा कर्णधार एरिक सॅमसनने धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती यापूर्वीच दिली आहे. दुखापत झालेली असतानाही त्याने उत्तम फटकेबाजी केल्याचं एरिकने म्हटलं आहे. "त्याच्या दुखापतीबद्दल तो सोडून इतर सर्वांना चिंता आहे. तो फार कणखर आहे. मी माझ्या आयुष्यात अशा फार कमी लोकांना भेटलो आहे. त्याला नेमका किती त्रास होतोय हे मी सांगू शकत नाही. तो अशा परिस्थितीमध्येही खेळतोय," असं एरिकने म्हटलं आहे.