IPL 2024: 'मला काही हे आवडलेलं नाही,' रोहित शर्मा अखेर स्पष्टच बोलला, 'असं दाखवतायत जणू काही...'

IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्याला 'इम्पॅक्ट प्लेअर नियम' (Impact Player Rule) फार काही आवडला नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. त्याने यामागील कारणाचाही उलगडा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 18, 2024, 12:57 PM IST
IPL 2024: 'मला काही हे आवडलेलं नाही,' रोहित शर्मा अखेर स्पष्टच बोलला, 'असं दाखवतायत जणू काही...' title=

IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्माने (Rohit Sharma) आपण 'इम्पॅक्ट प्लेअर नियमाचे' (Impact Player Rule) फार काही मोठे चाहते नसल्याचं स्पष्ट केलं आहे. रोहित शर्माने यामागील नेमकं कारणही सांगितलं आहे. "मी इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा फार काही मोठा चाहता नाही. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंना राखून ठेवलं जात आहे. क्रिकेट हे मुख्यत्वे 12 नव्हे तर 11 जण खेळतात. लोकांचं मनोरंजन करण्याच्या हेतूने तुम्ही खेळातील अनेक गोष्टी हिरावून घेत आहात," असं रोहित शर्मा म्हणाला आहे.

रोहित शर्माने नवा नियम वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यासारख्या अष्टपैलू खेळाडूंना अजिबात मदत करत नसल्याची खंतही व्यक्त केली आहे. वॉशिंग्टन सुंदरला सनरायजर्स हैदराबादकडून खेळण्याची फारशी संधी मिळालेली नाही. तर दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्जकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या शिवम दुबेला अद्याप एकदाही गोलंदाजीची संधी मिळालेली नाही. 

"जर तुम्ही क्रिकेटच्या दृष्टीकोनातून पाहिलंत तर मला वाटतं शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांना गोलंदाजीची अजिबात संधी मिळत नाही आहे. ही फार चांगली बाब नाही," असं रोहित शर्माने म्हटलं आहे. "आपण याबाबत काय करु शकतो याची मला कल्पना नाही. तुमच्याकडे एकूण 12 खेळाडू आहेत. हे थोडं मनोरंजक आहे. तुम्ही सामना कसा सुरु आहे किंवा खेळपट्टी कशी आहे याच्या आधारे इम्पॅक्ट प्लेअरला आणू शकता".

"जर तुम्ही चांगली फलंदाजी केली आणि विकेट गमावले नाहीत तर आणखी एक गोलंदाज आणू शकता. यामुळे तुम्हाला 6 ते 7 गोलंदाजांना खेळवण्याचा पर्याय मिळतो. अनेक संघातील फलंदाज चांगली फलंदाजी करत असल्याने सातव्या आणि आठव्या क्रमाकांच्या खेळाडूला फलंदाजी करण्याची संधी फार कमी वेळा मिळते. त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त फलंदाजाची गरज नाही," असं रोहित शर्मा म्हणाला आहे.

अ‍ॅडम गिलक्रिस्टच्या पॉडकास्टमध्ये रोहित शर्मा बोलत होता. अ‍ॅडम गिलक्रिस्टनेही यावर आपलं मत मांडताना नवा नियम खेळाची एकात्मकता घालवत असल्याचं म्हटलं आहे. "यामुळे काहीतरी विशेष गोष्टीची भर पडली आहे. हा नवा नियम प्रेक्षक आणि त्यांच्या मनोरंजनासाठी आणण्यात आला आहे. पण तुम्ही क्रिकेटच्या मुलभूत गोष्टीशी छेडछाड करत आहात," असं अ‍ॅडम गिलक्रिस्टने म्हटलं आहे. 

“टी-20 इतकं मनोरंजक होतं, कारण तुम्ही क्रिकेटच्या अखंडतेशी तडजोड करत नव्हता. 11 विरुद्ध 11 खेळाडू, समान आकाराचे फील्ड, निर्बंध देखील समान. यामध्ये अशा कोही नौटंकीची गरज नव्हती. मला हे काळजीचं वाटत आहे,” असं गिलक्रिस्ट पुढे म्हणाला.