आंतरराष्ट्रीय मॅच न खेळता १८ पट रक्कम, आयपीएलच्या पहिल्याच मॅचमध्ये भेदक बॉलिंग

 मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थानचा सनसनाटी विजय झाला.

Updated: Apr 23, 2018, 05:33 PM IST
आंतरराष्ट्रीय मॅच न खेळता १८ पट रक्कम, आयपीएलच्या पहिल्याच मॅचमध्ये भेदक बॉलिंग title=

जयपूर : मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थानचा सनसनाटी विजय झाला. कृष्णप्पा गौतम आणि जोफ्रा आर्चर हे दोन खेळाडू राजस्थानच्या विजयाचे शिल्पकार ठरले. आपली पहिलीच आयपीएल मॅच खेळणाऱ्या जोफ्रा आर्चरनं मुंबईला एका मागोमाग एक धक्के दिले. यामुळे मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणाऱ्या मुंबईला कमी धावांवर समाधान मानावं लागलं. या मॅचमध्ये आर्चरनं ३ विकेट घेतल्या. या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईनं १४ ओव्हरमध्ये १३० रन केल्या होत्या. एवढा स्कोअर असताना कॅप्टन रोहित शर्मानंही मोठ्या स्कोअरची अपेक्षा केली होती. पण जोफ्रा आर्चरनं एकाच ओव्हरमध्ये मॅचचं चित्र बदललं.

अशी होती आर्चरची १९वी ओव्हर

१९व्या ओव्हरचा पहिला बॉल आर्चरनं कृणाल पांड्याला टाकला. या बॉलवर मोठा शॉट मारण्याच्या नादात कृणाल पांड्यानं हेनरिक क्लासीनला कॅच दिला. पुढच्या बॉलला पोलार्डनं एक रन काढून हार्दिक पांड्याला स्ट्राईक दिला. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला हार्दिकनं फोर मारली. चौथ्या बॉलला आर्चरनं यॉकर्रवर हार्दिकला बोल्ड केलं. पाचवा बॉलही आर्चरनं यॉर्कर टाकला आणि मॅकलेनघन पहिल्याच बॉलला आऊट झाला. ओव्हरच्या सहाव्या बॉलवर आर्चरला हॅट्रिक मात्र घेता आली नाही.

मुंबईची बॅटिंग गडगडली

जोफ्रा आर्चरच्या जबरदस्त बॉलिंगमुळे मुंबईला शेवटच्या ३५ बॉलवर फक्त ३७ रन करता आले. यामध्ये मुंबईनं सहा विकेटही गमावल्या. यातल्या तीन विकेट आयपीएलमध्ये पहिलीच मॅच खेळणाऱ्या जोफ्रा आर्चरनं घेतल्या. शेवटच्या ५ ओव्हरमध्ये मुंबईला फक्त ३२ रन बनवता आल्या. आर्चरनं ४ ओव्हरमध्ये २२ रन देऊन ३ विकेट घेतल्या.

आर्चरवर ७.२० कोटी रुपयांची बोली

आयपीएलच्या पहिल्याच मॅचमध्ये शानदार बॉलिंग करणाऱ्या जोफ्रा आर्चरनं एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेली नाही. तरी टी-20 लीगमध्ये आर्चरला मोठी मागणी आहे. यामुळेच राजस्थाननं आर्चरला ७.२० कोटी रुपये मोजून विकत घेतलं. आर्चरची बेस प्राईस ४० लाख रुपये होती. तब्बल १८ टक्के जास्त रक्कम देऊन राजस्थाननं आर्चरला टीममध्ये घेतलं.

वेस्ट इंडिच्या जोफ्राला खेळायचंय इंग्लंडकडून

२२ वर्षांचा जोफ्रा आर्चर बारबाडोसचा रहिवासी आहे. वेस्ट इंडिजकडून जोफ्रा अंडर १९ क्रिकेट खेळला आहे. पण ब्रिटीश पासपोर्ट असल्यामुळे जोफ्रा आर्चरला इंग्लंडकडून खेळायचं आहे. २०२२ साली इंग्लंडकडून क्रिकेट खेळण्यासाठी जोफ्रा पात्र होईल.