टीम निवडीत डावललं, क्रिकेटपटूचा दिल्ली निवड समिती अध्यक्ष अमित भंडारींवर हल्ला

भारताचे माजी फास्ट बॉलर आणि दिल्लीच्या निवड समितीचे अध्यक्ष अमित भंडारी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

Updated: Feb 11, 2019, 06:32 PM IST
टीम निवडीत डावललं, क्रिकेटपटूचा दिल्ली निवड समिती अध्यक्ष अमित भंडारींवर हल्ला title=
फोटो सौजन्य : एएनआय

नवी दिल्ली : भारताचे माजी फास्ट बॉलर आणि दिल्लीच्या निवड समितीचे अध्यक्ष अमित भंडारी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. अंडर-२३ ट्रायलदरम्यान अमित भंडारी यांच्यावर एका ज्युनियर क्रिकेटपटूनं हा हल्ला केला. यामुळे भंडारींच्या डोक्याला, कानाला आणि पायाला दुखापत झाली आहे. अमित भंडारी यांना संत परमानंद रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ४० वर्षांचे अमित भंडारी भारताकडून २ वनडे मॅच खेळले आहेत. तसंच त्यांनी ९५ प्रथम श्रेणी आणि १०५ लिस्ट ए मॅच खेळल्या आहेत.

अमित भंडारींवर झालेला हा हल्ला खेळाडूंच्या निवडीवरून झाला आहे. मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीसाठी दिल्लीच्या टीमची निवड होणार होती. या टीममध्ये अनुज डेढाची निवड झाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या अनुजनं पहिले अमित भंडारींना कानशिलात लगावली. यानंतर मागून दोन जणांनी अमित भंडारींवर हॉकी स्टीकनं हल्ला केला.

या घटनेनंतर दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघ (डीडीसीए) अध्यक्ष रजत शर्मा म्हणाले, 'घडलेल्या प्रकाराची माहिती आम्ही घेत आहोत. राष्ट्रीय अंडर-२३ स्पर्धेसाठीच्या संभाव्य खेळाडूंमध्ये या खेळाडूचं नाव नव्हतं. टीममध्ये निवड न झाल्यामुळे एका खेळाडूनं हे कृत्य केल्याची माहिती आमच्याकडे आहे. ज्यांनी कोणी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावर कारवाई होईल. तसंच आम्ही एफआयआर दाखल करू.'

Amit Bhandari

दिल्लीच्या टीमचे प्रशासक शंकर सैनी म्हणाले 'मी एका सहकाऱ्यासोबत तंबूमध्ये जेवत होतो. त्यावेळी भंडारी आणि निवड समितीचे अन्य सदस्य सीनियर टीमचे प्रशिक्षक मिथून मन्हाससोबत ट्रायल मॅच बघत होते. तेव्हा दोन लोकं आली आणि ते भंडारींजवळ गेले. भंडारींसोबत त्यांची बाचाबाची झाली. यानंतर ती लोकं निघून गेली. थोड्यावेळानंतर काही जण हॉकी स्टीक, लोखंडाची छडी आणि सायकल चेन घेऊन आले. ट्रायलमध्ये खेळणारे खेळाडू आणि आम्ही भंडारींना वाचवण्यासाठी धावलो. मध्ये पडलात तर गोळी घालू, अशी धमकी त्यांनी आम्हाला दिली. त्यांनी भंडारींना हॉकी स्टीक आणि लोखंडाच्या छडीनं मारलं. भंडारींच्या डोक्याला इजा झाली आहे.'