कुलचा जोडीची बल्ले बल्ले! T20 WC साठी कुलचा जोडीला मिळणार संधी

ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे! T20 WC साठी कुलचा जोडीचं तिकीट कन्फर्म!   

Updated: Apr 29, 2022, 03:02 PM IST
कुलचा जोडीची बल्ले बल्ले! T20 WC साठी कुलचा जोडीला मिळणार संधी  title=

मुंबई : ज्या प्रसिद्ध जोडीला खराब फॉर्ममुळे बाहेर बसवलं आज आयपीएलमध्ये त्याच जोडीचा डंका आहे. कुलचाने यंदाच्या हंगामात कहर केला आहे. दोघांनीही आपलं टी 20 वर्ल्ड कपसाठी तिकीट फायनल केलं आहे. टीम इंडियात या दोघांनाही संधी मिळणार आता हे निश्चित झालं आहे. 

कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना कोहलीनं फार एकत्र खेळण्याची संधी दिली नव्हती. एकामागे एक करत दोघांनाही टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला. आता या दोघांनी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पर्पल कॅपच्या स्पर्धेत युजवेंद्र चहल आघाडीवर आहे. 

युजवेंद्र चहलने क्रिकेटप्रेमींचं मन जिंकलं आहे. पर्पल कॅपचा तो दावेदार मानला जात आहे. त्याने 8 मॅचमध्ये 18 विकेट्स घेतल्या आहेत. चहल आपल्या करिअरमध्ये सर्वोत्तम फॉर्ममध्ये पुन्हा आला आहे. त्याचं सोशल मीडियावरही खूप कौतुक होत आहे. 

मागच्या टी 20 वर्ल्ड कपममध्ये चहलला खेळण्याची संधी दिली नव्हती. त्यामुळे अनेक दिग्गज हैराण झाले होते. मात्र यंदा टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी मिळणार हे निश्चित झालं आहे. फक्त अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी आहे. 

कुलदीप यादवने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या हंगामात कुलदीपची कामगिरी खूप उत्तम राहिली आहे. 8 सामन्यात त्याने 17 विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीपच्या कामगिरीचं कौतुक होत आहे. तर पर्पल कॅपसाठी दोन खास मित्रांमध्येच चुरस लागल्याचंही पाहायला मिळत आहे. 

कुलचा जोडी बड्या फलंदाजांसाठी अडचणीचे ठरले होते. मात्र मधल्या काही काळात या दोघांनाही टीम इंडियातून संधी दिली नव्हती. आता कुलचा जोडी पुन्हा एकदा मैदानात धुमाकूळ घालणार आहे. कुलचा जोडी टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकवण्यासाठी फायद्याची ठरेल अशी आशा अनेक दिग्गजांनी व्यक्त केली.