ऑस्ट्रेलियात आता नाणं उडवून नाही, तर असा होणार टॉस

क्रिकेटमध्ये प्रत्येक मॅचची सुरुवात टॉस पाडून होते.

Updated: Dec 11, 2018, 06:58 PM IST
ऑस्ट्रेलियात आता नाणं उडवून नाही, तर असा होणार टॉस title=

मेलबर्न : क्रिकेटमध्ये प्रत्येक मॅचची सुरुवात टॉस पाडून होते. दोन्ही टीमचे कर्णधार मैदानात येतात आणि नाणं उडवलं जातं. टॉस जिंकलेला कर्णधार पहिले बॅटिंग करायची का बॉलिंग याचा निर्णय घेतो. नाणं उडवून टॉस पाडण्याची या प्रचलित परंपरेमध्ये आता बदल होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) नव्या पद्धतीनं टॉस उडवला जाईल. बीबीएलच्या मोसमाची सुरुवात १९ डिसेंबरपासून सुरु होईल. बीबीएलच्या मॅचमध्ये आता नाणं नाही तर बॅट उडवून टॉस पाडण्यात येणार आहे. बिग बॅश लीगला १९ डिसेंबरपासून ब्रिस्बेन हीट आणि ऍडलेड स्ट्रायकर्सच्या मॅचनी सुरुवात होईल. या मॅचपासून बॅट उडवून टॉस पाडण्याला पुन्हा सुरुवात होईल.

ऑस्ट्रेलियामध्ये याआधी बॅट उडवून टॉस पाडला जायचा. आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियातली टी-२० स्पर्धा असलेल्या बीबीएलमध्ये ही जुनी पद्धत वापरण्यात येणार आहे. दोन्ही टीमच्या कर्णधार आता बॅटच्या पडण्याचा अंदाज लावतील. ज्या कर्णधाराचा अंदाज बरोबर येईल तो बॅटिंग किंवा बॉलिंगचा निर्णय घेईल.

आयपीएलप्रमाणेच होणार मॅच

बीबीएलच्या मागच्या मोसमात ४० ग्रुप मॅच खेळवण्यात आल्या होत्या. यावेळी मात्र आयपीएलप्रमाणे बीबीएलमध्ये ५६ मॅच होतील. प्रत्येक टीम दुसऱ्या टीमविरुद्ध घरच्या मैदानात एक आणि दुसऱ्या टीमच्या विरुद्ध एक अशा प्रत्येकी २ मॅच खेळतील. बीबीएलमधल्या ८ टीम एकूण १४ मॅच खेळतील. ग्रुप मॅचनंतर नॉकआऊट मॅच होतील. बीबीएल यंदा ६१ दिवस चालणार आहे. मागच्यावर्षी पेक्षा ही स्पर्धा १३ दिवस जास्त असेल.

गोलकोस्ट मैदानातही मॅच होणार

यावर्षी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातल्या टी-२० मॅचचं आयोजन करणाऱ्या गोलकोस्टच्या नव्या मेट्रीकोन स्टेडियमध्ये बीबीएलच्या मॅच होणार आहेत. याशिवाय एलीस स्प्रिंग्समध्ये ट्रेगर पार्क आणि लांसेस्टनमधल्या यूटीएएस स्टेडियममध्येही काही मॅच खेळवण्यात येतील. टीमना घरच्या आणि बाहेरच्या मैदानात खेळवून लीगला मोठं करणं हीच आमची रणनिती आणि उद्दीष्ट असल्याचं बीबीएलचे प्रमुख किम मॅक्कोनी म्हणाले.