भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा क्रिकेट? पाहा काय म्हणाले पीसीबी अध्यक्ष

गेल्या कित्येक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातले क्रिकेट सामने फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्येच पाहायला मिळत आहेत. 

Updated: Sep 14, 2020, 11:24 PM IST
भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा क्रिकेट? पाहा काय म्हणाले पीसीबी अध्यक्ष title=

मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातले क्रिकेट सामने फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्येच पाहायला मिळत आहेत. मागच्या काही काळात पाकिस्तानच्या माजी आणि सध्याच्या खेळाडूंनी भारताविरुद्ध क्रिकेट मॅच खेळण्याची इच्छा वर्तवली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सीरिजबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारत-पाकिस्तानमधील सीरिज होणं अशक्य आहे. 

जोपर्यंत राजकीय संबंध सुधारत नाहीत, तोपर्यंत भारत-पाकिस्तान सीरिज होऊ शकत नाही, असं एहसान मणी एका मुलाखतीत म्हणाले. 'भारताला पहिले आमच्यासोबतचे राजकीय मतभेद दूर करावे लागतील. जर असं झालं नाही, तर दोन्ही देशांमध्ये क्रिकेट सामने होणं संभव नाही. बीसीसीआयने आमच्याशी क्रिकेटबाबत बोलणी करावीत. सीरिजसाठी बीसीसीआयशी चर्चा करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. आम्ही बीसीसीआयकडे अनेक वेळा दोन्ही देशांमधल्या सीरिजचा प्रस्ताव ठेवला होता. पण बीसीसीआयने तो नाकरला. त्यामुळे कोणतीही टी-२० लीग भारतासोबत खेळण्याची योजना नाही,' अशी प्रतिक्रिया एहसान मणी यांनी दिली. 

२०१३ नंतर भारत-पाकिस्तान सीरिज नाही

भारत-पाकिस्तान यांच्यात २०१३ साली शेवटची सीरिज खेळवली गेली होती. त्यावेळी पाकिस्तानची टीम भारत दौऱ्यावर आली होती. त्या दौऱ्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३ वनडे आणि २ टी-२० मॅच झाल्या होत्या. ७ वर्षांपूर्वी झालेल्या या वनडे सीरिजमध्ये पाकिस्तानचा २-१ ने विजय झाला, तर टी-२० सीरिज १-१ने बरोबरीत सुटली. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात २००७ साली शेवटची टेस्ट खेळवली गेली होती. जेव्हा पाकिस्तानची टीम भारत दौऱ्यावर होती. त्या टेस्ट सीरिजमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. २७ वर्षानंतर भारतीय जमिनीवर टीम इंडियाने पाकिस्तानला टेस्ट सीरिजमध्ये धूळ चारली होती.