INDvsAUS: रोहितने मोडला सचिनचा विक्रम, दादाच्या रेकॉर्डशी बरोबरी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताला विजयासाठी २७३ रनचं आव्हान आहे.

Updated: Mar 13, 2019, 07:26 PM IST
INDvsAUS: रोहितने मोडला सचिनचा विक्रम, दादाच्या रेकॉर्डशी बरोबरी title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताला विजयासाठी २७३ रनचं आव्हान आहे. या आव्हानचा पाठलाग करायला आलेल्या भारताला सुरुवातीलाच शिखर धवनच्या रुपात पहिला धक्का बसला. मागच्या मॅचमध्ये शतक झळकावणारा शिखर धवन या मॅचमध्ये १२ रनवर आऊट झाला. यानंतर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव सावरायला सुरुवात केली. यावेळी १३वी रन काढल्याबरोबरच रोहित शर्माने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाचा विक्रम मोडीत काढला आहे.

ओपनर म्हणून रोहित शर्मानं सगळ्यात जलद ६ हजार रनचा टप्पा गाठला आहे. १२१व्या डावामध्ये रोहित शर्माने हा विक्रम केला आहे. याआधी हे रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाच्या नावावर होतं. हाशीम आमलाने १२३ डावांमध्ये आणि सचिन तेंडुलकर याने १३३ डावांमध्ये ओपनर म्हणून ६ हजार रन केले होते.

सौरव गांगुलीच्या रेकॉर्डशी बरोबरी

याचबरोबर रोहित शर्माने या मॅचमध्ये सौरव गांगुलीच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. रोहित शर्माच्या वनडे क्रिकेटमध्ये ८ हजार रन झाल्या आहेत. रोहित शर्मा आणि सौरव गांगुली या दोघांनी २०६व्या वनडे इनिंगमध्ये हे रेकॉर्ड केलं आहे. सगळ्यात जलद ८ हजार रन पूर्ण करण्याच्याबाबतीत सौरव गांगुली आणि रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत विराट कोहली पहिल्या आणि एबी डिव्हिलियर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने १७५ वनडे इनिंगमध्ये आणि एबीने १८२ वनडे इनिंगमध्ये ८ हजार रनचा टप्पा ओलांडला होता. रॉस टेलरने २०३ इनिंगमध्ये, सचिन तेंडुलकरने २१० इनिंगमध्ये आणि ब्रायन लाराने २११ वनडे इनिंगमध्ये ८ हजार रन केले होते.