'काही तरुण वर्गात असण्याऐवजी रस्त्यावर', जेएनयू हिंसाचारावर गावसकरांची प्रतिक्रिया

जेएनयूमधल्या हिंसाचारावर वेगवेगळ्या सेलिब्रिटी व्यक्त होताना दिसत आहेत.

Updated: Jan 13, 2020, 11:36 AM IST
'काही तरुण वर्गात असण्याऐवजी रस्त्यावर', जेएनयू हिंसाचारावर गावसकरांची प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : जेएनयूमधल्या हिंसाचारावर वेगवेगळ्या सेलिब्रिटी व्यक्त होताना दिसत आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनीही याबाबत त्यांचं मत व्यक्त केलं आहे. आमचे काही तरुण वर्गात असण्यापेक्षा रस्त्यावर आहेत, त्यामुळे देशात बेचैनी आहे, असं गावसकर म्हणाले. दिल्लीतल्या एका कार्यक्रमात गावसकर आले होते.

'देशामध्ये बेचैनी आहे. काही युवा वर्गात असण्याऐवजी रस्त्यावर आहे. रस्त्यावर असलेले काही जण रुग्णालयात आहेत. पण बरेच जण वर्गात आहेत आणि देशाला पुढे नेण्यासाठी आपली कारकिर्द घडवण्यासाठी इच्छुक आहेत. आपण जेव्हा एकत्र असू, आपल्यातला प्रत्येकजण पहिले भारतीय असेल, तेव्हाच एक देश म्हणून आपण पुढे जाऊ शकू. आपण जेव्हा एकत्र असू तेव्हाच जिंकू, असं खेळ आपल्याला शिकवतो. देश याआधीही संकटातून बाहेर आला आहे आणि यावेळीही येईल,' असं वक्तव्य गावसकर यांनी केलं.

याआधी विराट कोहलीलाही नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन प्रश्न विचारण्यात आला होता. पण याबाबत आपल्याला पूर्ण माहिती नसल्यामुळे आपण कोणतंच वक्तव्य करणार नाही, असं विराटने सांगितलं. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातल्या आंदोलनाचे हिंसक पडसाद गुवाहाटीमध्ये उमटले होते. पण गुवाहाटीपर्यंत प्रवास करताना कोणतीच अडचण झाली नसल्याचं विराट म्हणाला होता.

गुवाहाटी शहर सुरक्षित आहे. आम्हाला इकडे पोहोचायला कोणतीच अडचण आली नाही. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत मी बेजबाबदार बोलणार नाही. तुमच्याकडे मतप्रदर्शन करण्याआधी पूर्ण माहिती असली पाहिजे, अशी प्रतिक्रिया विराटने दिली.