IPL स्थगित झाल्याने T20 वर्ल्डकप भारताऐवजी या देशात होण्याची शक्यता वाढली

भारतात टी-२० वर्ल्डकपचं आयोजन कठीण

शैलेश मुसळे | Updated: May 4, 2021, 05:55 PM IST
IPL स्थगित झाल्याने T20 वर्ल्डकप भारताऐवजी या देशात होण्याची शक्यता वाढली title=

मुंबई : कोरोनामुळे जगापुढे नवं संकट उभं राहिलं आहे. कोरोनाच्या संसर्ग खेळाडू्ंमध्ये वाढल्याने आयपीएल 2021 स्थगित करण्यात आले आहे. IPL पुढे ढकलल्यानंतर आता आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (ICC T20 world Cup) भारतात होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्डकप आता युएईमध्ये होण्याची शक्यता वाढली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वर्ल्डकप होणार आहे आणि यावेळी कोरोनाची तिसरी लाट देशात अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत कोणताही संघ येथे येऊ इच्छित नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मान्य केले आहे. महिन्याभरात अंतिम निर्णय घेण्यात येणार असला तरी, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 16 संघांची स्पर्धा घेण्याबाबत बीसीसीआयला भीती आहे. कारण बायो बबलमध्ये खेळाडू असताना देखील आयपीएल 2021 कोरोनाचा शिरकाव झाला.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी टी-20 वर्ल्डकप युएईमध्ये हलविण्याबाबत हालचाली सुरु असल्याचं मान्य केले आहे. भारतातील नऊ ठिकाणी आयोजित या स्पर्धेच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल स्पर्धा स्थगित करणं म्हणजे देशात वर्ल्डकपसाठी आरोग्याच्या दृष्टीने वातावरण बिघडलं आहे. त्यामुळे भारतात वर्ल्डकप होण्याची शक्यता कमीच आहे.'

नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट भारतात येण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले. यामुळे स्पर्धा युएईमध्ये हलविली जाऊ शकते.  त्याचे आयोजन बीसीसीआयच करेल. गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाचे 3 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. बहुतेक क्रिकेट बोर्डांना याची चिंता आहे आणि आयसीसी क्रिकेट संघ खेळाडूंच्या सुरक्षेबाबात धोका पत्करणार नाही. बऱ्याच देशांना परिस्थिती सामान्य होईपर्यंत येत्या सहा महिन्यांत भारतात जाण्याची इच्छा नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआयला ही स्पर्धा युएईमध्ये आयोजित करण्याशिवाय पर्याय नाही.

कोरोनाची दुसरी लहर शिगेला पोहोचली असताना, भारतातील आयपीएल स्पर्धा ही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ होते. सर्व काही व्यवस्थित चालू होते, परंतु कोरोना बायो बबलमध्ये शिरल्याने आयपीएल स्थगित करावी लागली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हे पुन्हा होणार नाही याची शाश्वती कोणाची देऊ शकत नाही. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडसारखे देश निश्चितच भारत येण्यासाठी निश्चितच तयार नाहीत.