RR vs PBKS: ...तिथेच आम्ही सामना हरलो; सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला संजू सॅमसन?

RR vs PBKS: पराभवानंतर राजस्थानच्या टीमचा कर्धार संजू सॅमसन काहीसा नाराज दिसून आला. पाहूया या पराभवानंतर संजू नेमकं काय म्हणाला.

सुरभि जगदीश | Updated: May 16, 2024, 08:46 AM IST
RR vs PBKS: ...तिथेच आम्ही सामना हरलो; सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला संजू सॅमसन? title=

RR vs PBKS: बुधवारी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पंजाबच्या टीमने राजस्थान 5 विकेट्सने पराभव केला. सुरुवातीला 9 सामन्यामध्ये 8 विजय मिळवल्यानंतर मात्र आता संजू सॅमसनच्या टीमला सलग 4 पराभवांचा सामना करावा लागला आहे. पंजाबने त्यांच्या घरच्याच मैदानावर राजस्थानचा धुव्वा उडवला. या पराभवानंतर राजस्थानच्या टीमचा कर्धार संजू सॅमसन काहीसा नाराज दिसून आला. पाहूया या पराभवानंतर संजू नेमकं काय म्हणाला.

सलग चौथ्या पराभवानंतर संजू काय म्हणाला?

संजू सॅमसनच्या मते, खराब फलंदाजीमुळे त्यांच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सामना संपल्यानंतर संजू म्हणाला, 'आम्हाला आणखी काही रन्स करणं आवश्यक होतं. कदाचित आम्ही 10-15 रन्स कमी केलं असं मला वाटतं. आम्ही सहज 160 पेक्षा जास्त रन्स करू शकलो असतो. इथेच आम्ही सामना हरलो. दुसरा चांगला गोलंदाजीचा पर्याय असता तर बरं झालं असतं. पण मला 5 गोलंदाजांसोबत खेळण्याची सवय झाली आहे.

आम्हाला पराभवाचा सामना करावा लागतोय. या सिझनमध्ये आम्ही सलग चार सामने गमावले आहेत. एक टीम म्हणून काय चूक होतेय हे आपण शोधून काढलं पाहिजे. आमच्या टीम अनेक मॅचविनर्स आहेत. या सिझनमध्येही आम्ही अशा विकेटवर खेळलो नाही जिथे 200 पेक्षा जास्त रन्स सहज होतात. आम्हाला हुशारीने क्रिकेट खेळायचं होतं आणि पार्टनरशिप निर्माण करायची होती. येत्या सामन्यांमध्ये निकाल आमच्या बाजूने लागेल अशी आशा असल्याचं संजूने म्हटलंय. 

राजस्थानने पंजाबला 145 रन्सचं जिंकण्यासाठी आव्हान दिलं होतं. यावेळी लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अतिशय खराब झाली. भेदक गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट पटकावली. या सामन्यात पंजाबने अवघ्या 48 रन्समध्ये चार विकेट्स गमावल्या होत्या. राजस्थानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला होता. मात्र यावेळी पंजाबसाठी सॅम करन धावून आला. कर्णधार सॅम करन आणि उपकर्णधार जितेश शर्मा यांनी पंजाबचा डाव सांभाळला. दोघांमध्ये 63 धावांची भागीदारी झाली. अखेरीस 5 विकेट्सने पंजाबने राजस्थानचा पराभव केला.