6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6... अशी बॅटिंग कधी पाहिली नसेल! 22 बॉलमध्ये 112 धावा; हा Video पाहाच

Viral Video Cricket Insane Batting: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. लेकाचा खेळ पाहण्यासाठी मैदानात आलेल्या आईने दिलेल्या प्रतिसादाचा व्हिडीओही व्हायरल होतोय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 23, 2024, 01:56 PM IST
6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6... अशी बॅटिंग कधी पाहिली नसेल! 22 बॉलमध्ये 112 धावा; हा Video पाहाच title=
हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल

Viral Video Cricket Insane Batting: ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग 2023-24 (BBL 2024) मधील चॅलेंजर सामन्यामध्ये ब्रिसबेन हीटचा सलामीवीर जोश ब्राउनने दमदार कामगिरी केली आहे. त्याने एडलेड स्ट्राइकर्सच्या संघाविरुद्ध तुफान फलंदाजीचा नजराणा सादर करत चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. जोश ब्राउनने अवघ्या 57 बॉलमध्ये 140 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये 41 व्या चेंडूला त्याने शतक झळकावलं. 

योग्य टप्प्यावर गोलंदाजीच केली नाही

जोश ब्राउन या खेळीत इतका आक्रमक पद्धतीने खेळत होता की गोलंदाजांना त्याला गोलंदाजी करताना योग्य टप्प्यावर चेंडूच टाकता येत नव्हते. जोशने या गोष्टीचा फायदा घेत आपल्या खेळीमध्ये एक दोन नाही तर तब्बल 12 षटकार लगावले. 245 च्या स्ट्राइक रेटने जोशने धावा जमवल्या. त्याची फटकेबाजी पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रिसबेन हीटने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात 214 धावा केल्या.

सर्वात मोठी धावसंख्या

जोश ब्राउनने 41 बॉलमध्ये शतक झळकावलं. त्यानंतर त्याने 16 बॉलमध्ये 40 धावा केल्या. बिग बॅश लीगच्या इतिहासामध्ये एकाच खेळीमध्ये पहिल्यांदाच एवढेच षटकार लगावले आहेत. एकाच डावात एकाच खेळाडूने सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम ब्राउनने आपल्या नावावर नोंदवला आहे. जोशने आपल्या खेळीत 10 चौकारही लगावले. म्हणजेच त्याने 12X6 = 72 धावा षटकाराच्या मदतीने तर 10x4 = 40 धावा चौकारांच्या मदतीने केल्या. त्याने चौकार-षटकारांच्या माध्यमातून अवघ्या 22 बॉलमध्ये 112 धावा केल्या. तसेच बिग बॅश लीगच्या बाद सामन्यामध्ये कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आहे.

सर्वात वेगवान शतक

बिग बॅश लीगच्या इतिसाहासामध्ये संयुक्तपणे सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्यांमध्ये जोश ब्राउनने दुसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम बिग बॅश लीगमध्ये क्रॅग सिमेंसच्या नावावर आहे. त्याने 2014 मध्ये अवघ्या 39 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं. बीबीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलनेही अवघ्या 41 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं.

आई सुद्धा होती मैदानात

ज्यावेळेस जोश ब्राउनने ही तुफान खेळी केली तेव्हा त्याची आई सुद्धा मैदानात प्रेक्षकांमध्ये उपस्थित होती. आपल्या मुलाची ही खेळी पाहून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. आपला मुलगा एवढ्या उत्तम दर्जाचं टी-20 क्रिकेट खेळतो याची कल्पनाच त्यांना नव्हती. जोश ब्राउनच्या आईची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिग बॅश लीगमध्ये अनेक खेळाडूंनी अशाप्रकारच्या वेगवान खेळी केल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील आयपीएलसारखी ही स्पर्धा असून आयपीएल इतकीच या स्पर्धेची क्रेझ असते.