शोएब अख्तर म्हणतो; 'भारत नाही तर, या टीम वर्ल्ड कप विजयाच्या दावेदार'

५० ओव्हरचा वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 

Updated: Apr 9, 2019, 06:25 PM IST
शोएब अख्तर म्हणतो; 'भारत नाही तर, या टीम वर्ल्ड कप विजयाच्या दावेदार' title=

मुंबई : ५० ओव्हरचा वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. यंदाचा वर्ल्ड कप कोण जिंकणार याबद्दल अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंडला जिंकण्याची संधी असल्याचं अनेकांना वाटत आहे. पण पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने मात्र याबाबत वेगळंच मत व्यक्त केलं आहे.

शोएब अख्तरच्या मते इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या तीन टीम वर्ल्ड कप जिंकण्याच्या प्रबळ दावेदार आहेत. ट्विटरवर एका चाहत्याने शोएब अख्तरला यंदाचा वर्ल्ड कप कोण जिंकणार असा प्रश्न विचारला होता. तेव्हा अख्तरने हे उत्तर दिलं.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची टीम खराब फॉर्ममध्ये आहे. युएईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे सीरिजमध्ये पाकिस्तानचा ५-०ने पराभव झाला होता. तर भारतामध्येही ऑस्ट्रेलियाने ५ वनडे मॅचची सीरिज ३-२ने जिंकली होती. वर्ल्ड कप आधीच्या लागोपाठ ८ मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आहे. मुख्य म्हणजे डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या अनुपस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी केली. यामुळे वर्ल्ड कपसाठी त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल.

इंग्लंडमध्ये मोहम्मद आमीर महत्त्वाचा

चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ सालच्या फायनलनंतर मोहम्मद आमीर खराब फॉर्ममध्ये आहे. फायनलनंतर मोहम्मद आमीरने ९२.६० च्या सरासरीने फक्त ५ विकेट घेतल्या आहेत. या खराब कामगिरीमुळे मोहम्मद आमीरला टीममधून डच्चूही देण्यात आला. पण इंग्लंडमधल्या वातावरणात मोहम्मद आमीर पाकिस्तानसाठी महत्त्वाचा खेळाडू असेल. त्यामुळे वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये मोहम्मद आमीरला संधी मिळावी, असं शोएब अख्तरला वाटतं.