World Cup 2019 : रोहितचं झुंजार शतक, वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची विजयी सलामी

रोहित शर्माच्या झुंजार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने २०१९ वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये ६ विकेटने विजय मिळवला आहे. 

Updated: Jun 5, 2019, 11:00 PM IST
World Cup 2019 : रोहितचं झुंजार शतक, वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची विजयी सलामी title=

साऊथम्पटन : रोहित शर्माच्या झुंजार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने २०१९ वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये ६ विकेटने विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या २२८ रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. शिखर धवन आणि विराट कोहली स्वस्तात आऊट झाले. पण रोहित शर्माने सुरुवातीला केएल राहुलसोबत आणि मग धोनीसोबत महत्त्वाच्या पार्टनरशीप करून टीम इंडियाला विजयापर्यंत पोहोचवलं.

रोहित शर्माने १४४ बॉलमध्ये नाबाद १२२ रन्सची खेळी केली. यामध्ये १३ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं हे २३वं शतक होतं. रोहित शर्माला केएल राहुलने २६ रन करून आणि धोनीने ३४ रन करून मदत केली. टीम इंडियाला विजय जवळ दिसत असतानाच धोनी आऊट झाला. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या हार्दिक पांड्याने फटकेबाजी केली. पांड्याने ७ बॉलमध्ये १५ रन्स केले, यामध्ये ३ फोरचा समावेश होता.

दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक २ विकेट घेतल्या, तर क्रिस मॉरिस आणि एन्डिल पेहलुक्वायोला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.

दक्षिण आफ्रिकेचा या वर्ल्ड कपमधला हा तिसऱ्या मॅचमधला तिसरा पराभव आहे. या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड आणि बांगलादेशनंतर आता भारताविरुद्ध पराभव झाला आहे. वर्ल्ड कपमधलं आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी आता दक्षिण आफ्रिकेला उरलेल्या सगळ्या मॅच जिंकाव्या लागणार आहेत.

२०१९च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलरनी भेदक बॉलिंग केली. यामुळे दक्षिण आफ्रिकेला ५० ओव्हरमध्ये २२७/९ एवढ्याच स्कोअरपर्यंत मजल मारता आली. जसप्रीत बुमराहने सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला दोन धक्के दिले, तर मधल्या ओव्हरमध्ये चहलने ठराविक अंतराने दक्षिण आफ्रिकेच्या विकेट घेतल्या.

युझवेंद्र चहलने १० ओव्हरमध्ये ५१ रन देऊन सर्वाधिक ४ विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. भुवनेश्वर कुमारने शेवटच्या ओव्हरमध्ये २ विकेट घेतल्या. कुलदीप यादवला १ विकेट घेण्यात यश आलं.

दक्षिण आफ्रिकेकडून क्रिस मॉरिसने ३४ बॉलमध्ये सर्वाधिक ४२ रन केल्या, तर नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या कागिसो रबाडाने ३५ बॉलमध्ये नाबाद ३१ रन केले. मॉरिस आणि रबाडा यांच्यामध्ये ६६ रनची पार्टनरशीप झाली. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला होता.

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा वर्ल्ड कपमधला हा दुसरा विजय आहे. याआधी २०१५ वर्ल्ड कपमध्ये भारताने पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला पराभूत केली होतं. तर १९९२, १९९९ आणि २०११ वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला होता.