Video: आक्रमक क्रिकेट खेळू म्हणजे रॉकेट लॉन्चर फेकून मारु का? पाकिस्तानी खेळाडूचा सवाल

Pakistani Cricketer Losing Cool Talks About Rocket Launcher: पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप 2023 साठी भारतात दाखल होण्याच्या आधीपासूनच चर्चेत आहे. असं असतानाच आता हा व्हिडीओ समोर आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 2, 2023, 10:03 AM IST
Video: आक्रमक क्रिकेट खेळू म्हणजे रॉकेट लॉन्चर फेकून मारु का? पाकिस्तानी खेळाडूचा सवाल title=
एका मुलाखतीदरम्यान केलं विधान

Pakistani Cricketer Losing Cool Talks About Rocket Launcher: वर्ल्ड कप 2023 च्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानचा संघ चर्चेत आहे. भारतात वर्ल्ड कप 2023 चं आयोजन केलं जात असल्याने भारतात येण्यापासून ते व्हिजा आणि त्यानंतरही सुरक्षेसंदर्भात पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने केलेले कमकुवत दावे आणि त्यावरुन घातलेल्या गोंधळामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघ चर्चेत राहिला. त्यानंतरही भारतामधील आगमन, पाहुणचार, हॉटेल वगैरेसारख्या गोष्टींमुळे बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ चर्चेत राहिला. सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर सलग 2 विजयानंतर 4 सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकत तिसरा विजय मिळवला. आता पाकिस्तानचा संघ सेमीफायनल्ससाठी पात्र होणार की नाही याची चर्चा सुरु आहे. सध्या पाकिस्तानी संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. इतर संघांवर पाकिस्तानला आता सेमीफायनल्सचं तिकीट पक्कं करण्यासाठी अवलंबून रहावं लागणार आहे.

तो व्हिडीओ कोणाचा?

भारताप्रमाणेच क्रिकेटवेड्या पाकिस्तानमध्ये वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्रांना उत आला आहे. पाकिस्तानमधील अनेक आजी-माजी क्रिकेटपटू या चर्चासत्रांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. त्यातच पाकिस्तानमधील या माजी क्रिकेटपटूंचे सल्ले ऐकून अनेकांना आश्चर्याचे धक्केही बसत आहेत. असं असतानाच याच एक्सपर्स्टचे काही जुने व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्कूप शॉट मारुन झेलबाद झालेला मिसबाह-उल-हक अशाच एका एक्सपर्स्टपैकी एक आहे. तो सध्या अनेक चर्चासत्रांमध्ये सहभागी होत असतानाच त्याचा एका जुना व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये क्रिकेटपटूंवर टीका करणाऱ्यांना तो अगदी मजेशीर आणि उपरोधिक प्रतिक्रिया नोंदवत उत्तर देताना दिसत आहे.

थेट रॉकेट लॉन्चरचा उल्लेख

मिसबाह-उल-हकच्या एका जुन्या मुलाखतीमध्ये त्याला पत्रकाराने पाकिस्तानी क्रिकेटपटू मोठे फटके मारलायला घाबरतात अशा अर्थाचा प्रश्न विचारला. त्यावर मिसबाह-उल-हकने, "मी चौकार षटकार मारत नाही का? मी मोठे फटके मारत नाही का? आक्रमक क्रिकेट म्हणजे काय विरोधी संघातील खेळाडूच्या डोक्यात रॉकेट लॉन्चर मारायचं का?" असा प्रतिप्रश्न विचारतो. हे उत्तर ऐकून प्रश्न विचारणाऱ्यालाही हसू येतं.

नक्की वाचा >> 'विराट कोहलीप्रमाणे तो...'; शाहीद आफ्रिदीने चारचौघात बाबर आझमची लाजच काढली

वैतागून म्हणाला, "कोण आहेत हे लोक जे..."

कारण नसताना होणाऱ्या टीकेला वैतागलेला मिसबाह-उल-हक थोड्या चिडलेल्या स्वारातच, "एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तर यात कोणाला काही अडचण आहे का? मी वाटेल तसा खेळेल. तुम्हाला धावाच हव्या आहेत ना?" असा प्रतिप्रश्न करताना दिसतो. तसेच पुढे बोलताना मिसबाह-उल-हक, "स्टाइक रेट हा प्रश्न असेल तर ही लोक कोण आहे ज्यांना हा प्रश्न पडला आहे? तुम्ही 20 ओव्हरमध्ये ऑल आऊट होत आहात. मी फलंदाजीला जातो तेव्हा 10 धावांवर 3 गडी तंबूत असतात. त्यावेळेस मी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. तिथून मी सामना 230 वर 3 पर्यंत घेऊन जातो. त्यानंतरही तुम्ही 235 वर बाद होता," असं म्हणत क्रिकेट हा सांघिक खेळ असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधतो.

नक्की वाचा >> 'पाकिस्तानला घाणेरडी सवय आहे की...'; Points Table वरुन हुसैनने झापलं; म्हणाला, 'पैंजेवर सांगतो...'

हा व्हिडीओ 2016 सालातील असला तरी आता तो व्हायरल होत आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

पाकिस्तानी क्रिकेटबद्दल फारच चर्चा

सध्या वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवरुन पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये बरीच चर्चा सुरु आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने खेळाडू, संघ निवडताना केलेला दुजाभाव, पाकिस्तानी खेळाडूंची कामगिरी या सर्व गोष्टींवर चर्चा सुरु असतानाच हा जुना मजेदार व्हिडीओ पाकिस्तानी खेळाडू किती वैतागलेले असतात हे दर्शवत असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.