आगरकर मोठा धक्का देण्याच्या तयारीत? World Cup संघातून 'या' दोघांना मिळू शकतो डच्चू तर...

World Cup 2023 Team India Changes: भारतीय संघाची घोषणा 5 सप्टेंबर रोजी करण्यात आली असून यामध्ये 15 खेळाडूंचा समावेश आहे. पण या संघातही ऐनवेळी बदल होण्याची शक्यता आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 9, 2023, 10:59 AM IST
आगरकर मोठा धक्का देण्याच्या तयारीत? World Cup संघातून 'या' दोघांना मिळू शकतो डच्चू तर... title=
भारतीय संघाची घोषणा 5 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे

World Cup 2023 Team India Changes: भारतामध्ये यंदाच्या वर्षी होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचष कस्पर्धेसाठी सर्व देशांनी आपआपल्या संघांची घोषणा केली आहे. अनेक संघांनी यासंदर्भातील तयारीही सुरु केली आहे. भारतीय संघ सध्या आशिया चषक स्पर्धा खेळत असून त्यानंतर भारत विश्वचषक स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. विश्वचषकाच्या दृष्टीने भारताने 5 सप्टेंबर रोजी संघ जाहीर केला आहे. भारतीय निवड समितीचे प्रमुख अजीत आगरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये संघाची घोषणा केली. यावेळेस कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होता. 

हा भारताचा अंतिम संघ नाही

भारताने विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघामध्ये एकूण 15 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या असणार आहे. मात्र भारताने निवडलेला हा संघ अंतिम नसल्याची चर्चा आहे. या संघामध्ये ऐनवेळी बदल केले जातील अशी दाट शक्यता आहे. विश्वचषक स्पर्धेच्या भारतीय संघामध्ये 2 खेळाडूंना वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळू शकते असं सांगितलं जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने विश्वचषक स्पर्धेचा संघ निवडण्यासाठी 5 सप्टेंबरची डेडलाइन दिली होती. मात्र आयसीसीने या निवडलेल्या संघामध्ये फेरबदल करण्यासाठी अंतिम तारीख 27 सप्टेंबरची दिली आहे. त्यामुळेच भारतीय संघामध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात असं मानलं जात आहे.

या खेळाडूला मिळू शकते संधी

आशिया चषकानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामने खेळणार आहे. या तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्तम कामगिरी केल्यास काही खेळाडूंचा संघात समावेश केला जाऊ शकतो. भारतीय निवड समितीने आशिया चषक स्पर्धेतील 2 खेळाडू वगळून 15 जणांच्या संघाची घोषणा केली आहे. आशिया चषकामध्ये खेळत असलेले मात्र विश्वचषकासाठीच्या संघात नसलेल्या खेळाडूंची नाव आहेत तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा! तिलक वर्माला आशिया चषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलं असलं तरी अंतिम 11 मध्ये त्याला एकाही सामन्यात स्थान मिळालेलं नाही. मात्र आशिया चषक किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये तिलक वर्माला संधी मिळाली आणि त्याने उत्तम कामगिरी केली तर त्याला अक्षर पटेलच्या जागी संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 

शार्दुल ठाकुरच्या जागी या खेळाडूला मिळणार संधी?

तिलक वर्माबरोबरच आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात असेलला पण विश्वचषकासाठी संघात संधी न मिळालेला वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या कामगिरीकडेही निवड समितीचं लक्ष आहे. विश्वचषकासाठी भारताच्या अंतिम 15 खेळाडूंच्या संघामध्ये स्थान मिळवण्याची एक संधी प्रसिद्ध कृष्णाकडे असल्याचं बोललं जात आहे. प्रसिद्ध कृष्णाला आशिया चषकातही अजून संधी मिळालेली नाही. मात्र संधी मिळाली आणि त्याने उत्तम कामगिरी केली तर त्याला शार्दुल ठाकुरच्या जागी संघात स्थान मिळू शकतं, असं म्हटलं जात आहे. अर्थात हे निर्णय अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीकडून घेतले जातील. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपर्यंत किंवा 27 तारखेपर्यंत सध्याच्या भारतीय संघामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विश्वचषकासाठी भारतीय संघ असा आहे -

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार ), के. एल. राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव