'त्या' 550 कोटींमुळे पाकिस्तानी संघ थेट भारतात न येता Via Dubai आला; जाणून घ्या कारण

Why Pakistan Team Come To Hyderabad Via Dubai: पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतामध्ये तब्बल 7 वर्षानंतर दाखल झाला. मात्र थेट लाहोरवरुन भारतात येण्याऐवजी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील हा संघ दुबईमार्गे भारतात आला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 28, 2023, 04:20 PM IST
'त्या' 550 कोटींमुळे पाकिस्तानी संघ थेट भारतात न येता Via Dubai आला; जाणून घ्या कारण title=
पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झाला आहे

Why Pakistan Team Come To Hyderabad Via Dubai: पाकिस्तानचा संघ एकदिवसीय वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तानच्या संघाचं बुधवारी रात्री हैदराबाद विमानतळावर आगमन झालं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ आपल्या देशाचे हिरव्या रंगाचे स्पेशल जॅकेट्स घालून पांढरा शर्ट, खाकी पॅण्ट असा लूकमध्ये बाहेर पडला. पाकिस्तानी संघ भारतात दाखल झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दुबईवरुन आलेलं पाकिस्तानी संघाचं प्लाईट हैदराबादमध्ये सांयकाळी लॅण्ड झालं. मात्र पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाल्यानंतर अनेकांना शेजारचा देश असलेल्या भारतात येण्यासाठी पाकिस्तानचा संघ अगदी दुबईला जाऊन तिकडून का आला? असा प्रश्न पडला आहे. 

अनेक संघ थेट त्यांच्या देशातून भारतात आले पण पाकिस्तान व्हाया दुबई

7 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानची पुरुष क्रिकेट संघ भारतात आला आहे. पाकिस्तानआधी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंकेसहीत बांगलादेशचा संघही थेट आपआपल्या देशांमधून भारतात दाखल झाले. मात्र पाकिस्तानचा संघ लाहोरवरुन दुबईला गेला आणि दुबईवरुन हैदराबादमध्ये दाखल झाला. मात्र पाकिस्तानी संघ थेट लाहोरवरुन हैदराबादला का आला नाही? तर यामागील कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये मागील अनेक दशकांपासून असलेले कटू संबंध. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतो असं सांगत भारताने 2019 मध्ये पाकिस्तानला जाणारी आणि तिथून येणारी सर्व विमानं, रेल्वे आणि बस सेवा बंद केली होती. त्यानंतर ही सेवा सुरुच झाली नाही. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. त्यानंतर भारताने 2019 पासून पाकिस्तानला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बस, ट्रेन आणि फ्लाइट बंद केल्या.

550 कोटींचा फटका

बालाकोट सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानने भारतासाठी एअर स्पेस बंद केला. त्यामुळे भारताची सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाला सर्वात मोठं नुकसान झालं. एअर इंडियाच्या दिल्ली ते यूरोप आणि अमेरेकेला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर याचा मोठा परिणाम झाला. पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी एअरस्पेस बंद केल्याने एअर इंडियाला 491 कोटींचं नुकसान झालं. राज्यसभेमध्ये केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी विमान कंपन्या स्पाइसजेट, इंडिगो आणि गोएअरला अनुक्रमे 30.73 कोटी, 25.1 कोटी आणि 2.1 कोटींचं नुकसान झालं. नुकसान झाल्याचा एकूण आकडा हा 550 कोटींच्या आसपास आहे. एअरस्ट्राइक नंतर एअर इंडियाला यूरोप आणि अमेरिकेत जाणाऱ्या आपल्या विमानांचा मार्ग बदलावा लागल्याने इंधनावरील खर्च वाढल्याने कंपन्यांना आर्थिक फटका बसला. 

नक्की वाचा >> 'तो तर आमच्या जावयासारखा'; भारतीय क्रिकेटपटूबद्दल शाहरुखच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

पाकिस्तानी संघाने 9 तास केला प्रवास

बाबर आझम आणि त्याचे सहकारी दुबईवरुन 9 तासांच्या फ्लाइटने हैदराबादमधील राजीव गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. हे सर्व खेळाडू बुधवारी सकाळी लाहोरवरुन हैदराबादला येण्यासाठी रवाना झाले होते. पाकिस्तानचा पहिला सराव सामना 29 सप्टेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. मात्र पाकिस्तानचा वर्ल्डकपमधील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी राजीव गांधी स्टेडियमवर नेदरलॅण्डविरुद्द होणार आहे.

नक्की वाचा >> भारताच्या पाहुणचाराने पाकिस्तानी खेळाडू भारावले! Insta Stories चर्चेत; बाबर म्हणतो, 'इथलं प्रेम...'

48 तास आधी भारतीय व्हिसा

हैदराबादमध्ये पोहचण्याआधी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला अवघ्या 48 तास आधी भारतीय व्हिसा मिळाला. जायबंदी झाल्याने बाबर आझम 2016 ची वर्ल्डकप स्पर्धा खेळला नव्हता. भारत आणि पाकिस्तानदरम्यान यंदा 14 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना खेळवला जाणार आहे.

भारतात पाकिस्तानी संघाचं स्वागत

पाकिस्तानी संघाला प्रचंड सुरक्षेमध्ये विमानतळावरुन हॉटेलवर नेण्यात आलं. पाकिस्तानी संघ विमानतळावरुन बाहेर पडताना अनेक क्रिकेट चाहत्यांनी भारताच्या या कट्टर प्रतिस्पर्धांचं स्वागत केलं.  विमानतळावर पाकिस्तानी संघाचं चाहत्यांनी स्वागत केल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पाकिस्तानी संघ बाहेर पडताना चाहत्यांनी मोबाईलमधून त्यांचे फोटो काढले, आरडाओरड करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी संघाला भारतात मिळालेला हा प्रतिसाद पाहून पाकिस्तानी खेळाडूंनाही आश्चर्याचा धक्का बसला.