'आम्हाला 2060 चा वर्ल्ड कप जिंकायचा आहे, चला...'; इंग्लंडला लिंबू-टिंबू संघाची स्पेशल ऑफर

Defending Champions England Condition In World Cup: इंग्लंडने 2019 साली अंतिम सामन्यामध्ये सर्वाधिक चौकार मारल्याच्या आधारावर टाय झालेल्या सामन्यात विजय मिळवत विश्वचषकावर नाव कोरलं होतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 2, 2023, 12:52 PM IST
'आम्हाला 2060 चा वर्ल्ड कप जिंकायचा आहे, चला...'; इंग्लंडला लिंबू-टिंबू संघाची स्पेशल ऑफर title=
सोशल मीडियावरुन दिली ऑफर

Defending Champions England Condition In World Cup: वर्ल्ड कप 2023 जिंकण्यासाठी सर्वात मजबूत दावेदार मानलेल्या काही संघांची फेफे उडाल्याचं चित्र मागील काही आठवड्यांमध्ये स्पर्धा सुरु झाल्यापासून पाहायला मिळत आहे. आधी रुळावरुन घसरलेला ऑस्ट्रेलियन संघ स्पर्धेत आता स्थिरावला असून अव्वल 4 मध्ये असला तरी यंदा इंग्लंडच्या संघासाठी वर्ल्ड कप अगदी भयान स्वप्न असल्याप्रमाणे ठरत आहे. इंग्लंडच्या संघाची अवस्था पाहून यांनीच खरोखर क्रिकेटचा शोध लावला का अशी अवस्था निर्माण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डींगमध्येही सुमार कामगिरी करणाऱ्या इंग्लंडच्या संघातील मैदानातील कामगिरीमुळे ते टीकेचे धनी ठरत असताना हे कमी म्हणून की काय इतर संघही या विद्यमान जग्गजेत्या संघाला ट्रोल करु लागले आहेत. याच ट्रोलिंगचा एक भाग म्हणून एका क्रिकेट बोर्डाने तर इंग्लंडचा संघ एवढा वाईट पद्धतीने खेळत आहे की त्यांनी आमच्याबरोबर गल्ली क्रिकेट खेळण्यासाठी यावं अशी ऑफर दिली आहे.

पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहे विद्यमान जग्गजेता संघ

सध्या इंग्लंडचं संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहे. इंग्लंडने आतापर्यंत वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमध्ये 6 सामन्यांपैकी केवळ एक सामना जिंकला आहे. इंग्लंडला अगदी अफगाणिस्ताननेही पराभूत केलं असून त्यांनी एकूण 5 सामने गमावले आहेत. इंग्लंड सेमीफायनल्ससाठी पात्र ठरण्याची शक्यता अगदी 1 टक्का इतकी आहे. आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वर्ल्ड कप 2023 च्या साखळी फेरीमधील अव्वल 7 संघ पात्र ठरणार असल्याने टॉप 7 मध्ये राहण्यासाठी इंग्लंडचा प्रयत्न असणार आहे.

चला 3 सामन्यांची मालिका खेळूयात

इंग्लंडचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी असतानाच आयर्लंड क्रिकेट बोर्डाने इंग्लंडला खोचक पद्धतीने एक ऑफर दिली आहे. "प्रिय, इंग्लिश क्रिकेट बोर्ड, खेळपट्ट्यासंदर्भात सध्या तुम्हाला बऱ्याच अडचणी असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. 2024 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रता फेरीआधी सराव व्हावा म्हणून रेकजाविकमध्ये 3 सामन्यांची मालिका खेळण्याची आम्ही तुम्हाला सार्वजनिक ऑफर देत आहोत," असं म्हणत थेट क्रिकेट सामने खेळण्याचं चॅलेंज दिलं आहे.

2060 चा वर्ल्ड कप जिंकण्याची आमची इच्छा

"अलीकडे आमच्या आयरिश चुलत भावांविरुद्ध तुम्ही खेळलात. त्यांच्या विरुद्ध तुम्ही क्रिकेट विश्वचषकासाठी सराव म्हणून तुमचा ब आणि क संघ खेळला होता. आम्हाला आशा आहे की तुम्ही तुमचा अ दर्जाचा संघ आमच्याविरुद्ध खेळण्यासाठी घेऊन याल. आम्ही क्रिकेटमध्ये झपाट्याने प्रगती करत असलेला देश आहोत. अजून आम्ही क्रिकेटमध्ये फार लहान असलो तरी 2060 चा वर्ल्ड कप (सॅल्मन फिशिंगचा वर्ल्ड कप) जिंकण्याची महत्त्वाकांक्षा आम्ही उराशी बाळगली आहे," असं या पोस्टच्या दुसऱ्या परिच्छेदात म्हटलं आहे. "तुमच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. तुमचीच गंमतीदार आइसलँडिक क्रिकेट असोसिएशन", असं म्हणत पत्राचा शेवट करण्यात आला आहे. तुम्हीच पाहा ही पोस्ट...

इंग्लंडच्या संघाचे वर्ल्ड कपमधील 3 सामने बाकी आहेत.