World Cup आधीच भारतीय संघाला मोठा धक्का! 6115 Km चा प्रवास करुनही हाती निराशाच

Big Shock For Team India Before World Cup: वर्ल्डकप स्पर्धा सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच भारतीय संघाला धक्का बसला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 4, 2023, 08:22 AM IST
World Cup आधीच भारतीय संघाला मोठा धक्का! 6115 Km चा प्रवास करुनही हाती निराशाच title=
वर्ल्डकप आधीच भारतीय संघाला मोठा धक्का

Big Shock For Team India Before World Cup: भारतीय संघाला आयसीसीच्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये उतरण्याआधीच एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाला या सर्वात मोठ्या स्पर्धेआधी सराव सामन्यांमध्ये खेळण्याची एकही संधी मिळाली नाही. आता भारतीय संघाला एकही सराव सामना न खेळता वर्ल्डकप स्पर्धेत उतरावं लागणार आहे. भारतीय संघाचे दोन्ही सराव सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. एक चेंडूही न टाकता हे सामने रद्द झाल्याने आता राजकोटमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर भारत आता थेट 8 तारखेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच मैदानात उतरणार आहे. गुवहाटीमधील इंग्लंडविरुद्धचा पहिला सराव सामना रद्द झाला आणि त्यानंतर मंगळवारी नेदरलँडविरुद्धचा सामनाही रद्द झाला. 

भारत प्रमुख दावेदार पण...

आयसीसीच्या वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. भारतामध्येच वर्ल्डकपची स्पर्धा होत असल्याने भारत ही स्पर्धा जिंकणाऱ्या संभाव्य संघापैकी प्रमुख दावेदार मानला जात आहे. भारतीय संघाची कामगिरी मागील काही महिन्यांपासून फारच समाधानकारक आहे. भारताने आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिकाही भारताने 2-1 च्या फरकाने जिंकली. मात्र वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेआधी कोणत्याही संघाला सराव सामन्यांची आवश्यकता असते ते सामने मात्र भारतीय संघाच्या नशिबात नाहीत. आधी गुवहाटी आणि नंतर तिरुवनंतपुरममधील सामना पावसामुळे रद्द करावा लागल्याने कोणताही सराव सामना न खेळता भारत थेट स्पर्धेबाहेर पडणार आहे.

6115 किलोमीटरचा प्रवास

आश्चर्याची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा राजकोटमधील तिसरा सामना संपवल्यानंतर भारतीय संघ गुवाहाटीला रवाना झाला. मात्र तेथील सामना रद्द झाला. त्यानंतर भारतीय संघ तिरुवनंतपुरमला रवाना झाला. मात्र येथील नेदरलँडविरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द झाला. म्हणजेच राजकोटच्या सामन्यानंतर 4 दिवसात भारतीय संघाने राजकोट ते गुवहाटी आणि गुवहाटी ते तिरुवनंतपुरम असा 6 हजार 115 किलोमीटरचा प्रवास केला मात्र भारतीय संघाच्या हाती निराशेशिवाय काहीच लागलं नाही. 

ऑस्ट्रेलियाची सराव सामन्यात दमदार कामगिरी

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या सराव सामन्यामध्ये 350 हून अधिक धावांचा डोंगर उभा करत तगड्या पाकिस्तानी संघाला 15 धावांनी पराभूत केलं. ऑस्ट्रेलियन संघाचा चांगला सराव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने राजकोटमध्ये खेळवण्यात आलेल्या भारताविरुद्धच्या मालिकेतील शेवटचा सामनाही जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे आता भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्डकप स्पर्धेत खेळवल्या जाणाऱ्या सामन्यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ कशी कामगिरी करतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.