World Cup 2019: वर्ल्ड कप टीमसाठी रोहितचा निवड समितीला सल्ला

३० मेपासून सुरु होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची निवड येत्या काही दिवसात होईल.

Updated: Apr 4, 2019, 08:40 PM IST
World Cup 2019: वर्ल्ड कप टीमसाठी रोहितचा निवड समितीला सल्ला title=

मुंबई : ३० मेपासून सुरु होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची निवड येत्या काही दिवसात होईल. २३ एप्रिलपर्यंत आयसीसीला वर्ल्ड कपसाठी निवडण्यात येणाऱ्या टीमची यादी द्यायची आहे. पण वर्ल्ड कपसाठीची टीम निवडताना मागच्या ४ वर्षातली कामगिरी आणि फॉर्म याचा विचार करण्यात यावा. खेळाडू आयपीएलमध्ये कसे खेळतायत हे पाहू नये, असा सल्ला रोहित शर्माने निवड समितीला दिला आहे. १२ मे रोजी आयपीएल संपल्यानंतर लगेचच वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

वर्ल्ड कपसाठीची १५ सदस्यांच्या टीमची निवड करताना निवड समिती आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवरही लक्ष देत आहे.

'निवड समिती आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष देईल, पण माझ्यामते आयपीएलमधली कामगिरी हा वर्ल्ड कपसाठीची टीम निवडण्यासाठीचा मापदंड नसावा,' असं मत रोहितने क्रिकेट डॉट कॉम या वेबसाईटशी बोलताना मांडलं.

'५० ओव्हरच्या स्पर्धेसाठी तुम्ही २० ओव्हरच्या मॅचमधली कामगिरी बघून टीमची निवड करू शकत नाही. आयपीएल ही वेगळी स्पर्धा आहे. हे फ्रॅन्चायजी क्रिकेट आहे. असं असलं तरी फॉर्म महत्त्वाचा आहे', असं वक्तव्य रोहितने केलं.

'मागच्या ४ वर्षांमध्ये आम्ही भरपूर वनडे क्रिकेट आणि टी-२० क्रिकेट खेळलो. एवढा कालावधी कोणता खेळाडू टीममध्ये हवा हे समजण्यासाठी पुरेसा आहे,' अशी प्रतिक्रिया रोहितने दिली.

वर्ल्ड कपसाठीच्या टीमची निवड करताना आयपीएलमधल्या कामगिरीचा विचार केला जाऊ नये, असं रोहित म्हणाला असला तरी, आयपीएलमुळे वर्ल्ड कपसाठीची तयारी करायला मदत होत आहे, असं रोहित म्हणाला.

'प्रत्येक वेळी आयपीएलनंतर एखादी मोठी स्पर्धा, टेस्ट सीरिज किंवा वनडे सीरिज असतेच. त्याआधी आयपीएल खेळल्याचा फायदाही होतो. मी बुमराहशी बोलत होतो. मॅच खेळण्यासाठी फिट व्हायला बुमराहला घरी बसून विश्रांती घेण्यापेक्षा जास्तीत जास्त मॅच खेळण्याची गरज आहे. बॅट्समन म्हणून माझंही तसंच आहे,' असं रोहितने सांगितलं.

वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम जवळपास निश्चित आहे, पण चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याची समस्या अजूनही कायम आहे. यावरही रोहितने भाष्य केलं. या क्रमांकावर कोणाला प्राधान्य द्यायचं याचा निर्णय कर्णधार विराट कोहली घेईल. या क्रमांकावर कोणाला खेळवायचं हे इंग्लंडमधल्या परिस्थितीवरही अवलंबून आहे, असं रोहित म्हणाला.

'वर्ल्ड कपसाठीची आमची टीम ही जवळपास निश्चित आहे. ज्या क्रमांकाबद्दल चर्चा सुरू आहे ते सगळ्यांना माहिती आहे. त्या एका क्रमांकासाठी तुम्हाला मधल्या फळीतला बॅट्समन, जास्तीचा ओपनर, जास्तीचा स्पिनर, फास्ट बॉलर यापैकी कोण हवंय?, याबद्दल कर्णधार, प्रशिक्षक आणि निवड समिती काय विचार करत आहे यावर सगळं अवलंबून आहे,' असं विधान रोहितने केलं.

'मागच्या वर्षी आम्ही इंग्लंडमध्ये होतो तेव्हा तिथलं वातावरण कोरडं होतं. पण वर्ल्ड कपमध्ये असंच वातावरण असेल का हे सांगता येणार नाही. पण जर असंच वातावरण असेल, तर भारतीय टीमला एका जादाच्या स्पिनरची गरज पडेल. पण जर वातावरण वेगळं असेल तर भारताला जादाचा फास्ट बॉलर लागेल. पण इंग्लंडमधलं वातावरण कसं असेल हे आत्ताच सांगता येणार नाही. पुढच्या काही दिवसांमध्ये टीमची निवड करावी लागणार आहे', अशी प्रतिक्रिया रोहितने दिली.