जेवणात वापराच्या मिठापासून भारतीयाने बनवलं सर्वात सुरक्षित इंधन! केवळ इलेक्ट्रीक करंट वापरुन...

Fire Safe Fuel Burns With An Electric Current: सध्याच्या ज्वलनशील इंधनाने पेट घेतल्याने होणारे अपघात आणि त्यात होणारी हानी टाळण्यासाठी रामबाण उपाय

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 2, 2023, 03:07 PM IST
जेवणात वापराच्या मिठापासून भारतीयाने बनवलं सर्वात सुरक्षित इंधन! केवळ इलेक्ट्रीक करंट वापरुन... title=
यासंदर्भातील सविस्तर अहवाल छापून आला आहे

Fire Safe Fuel Burns With An Electric Current: इंधनाची ने-आण करताना आग लागण्याचे प्रकार आणि त्यामुळे घडलेल्या अपघातांमुळे वित्तहानी, जिवीतहानी होण्याच्या दुर्घटना अनेकदा ऐकायला मिळतात. मात्र आता संशोधकांच्या एका टीमने एक असं इंधन शोधून काढलं आहे जे केवळ विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून सक्रीय होतं. म्हणजेच केवळ विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून हे इंधन जळू शकतं आणि त्यातून ऊर्जा निर्माण होऊ शकते. 

...तर इंधन पेट घेण्याची शक्यता कमी

कोणतेही इंधन हे द्रव्य स्थितीत असलं तरी या द्रव्याच्या वरील स्तरामध्ये इंधनामधील काही अस्थिर इंधन रेणू म्हणजेच व्होलेटाइल फ्युएल मॉलिक्यूल असतात. जेव्हा हे रेणू ऑक्सिजन आणि हवेच्या संपर्कात येतेता तेव्हा ते पेट घेतात. अशा रेणूंपर्यंत जर ऑक्सिजनचा पुरवठा रोखला तर ते पेट घेण्याची शक्यता फारच कमी होते. मात्र जेव्हा एखाद्या वाहनाच्या इंजिनमध्ये आपण या रेणूंना ऑक्सिजनपासून दूर ठेवण्याबद्दल विचार करतो तेव्हा हे लक्ष्य फारच कठीण असल्याचं जाणवतं. त्यामुळे यावर संशोधकांनी अनोख्या पद्धतीने शक्कल लढवून उपाय शोधला आहे.

...तर इंधनाच्या ज्वलनावर नियंत्रण मिळवता येतं

संशोधकांनी या इंधनासंदर्भातील पेटंट घेतलं आहे. जर्नल ऑफ द अमेरिकन केमिकल सोसायटीमध्ये छापून आलेल्या अहवालामध्ये या संशोधकांनी हे इंधन कसं तयार केलं जातं याची माहिती दिली आहे. या अहवालाचे भारतीय वंशाचे मुख्य लेखक पृथ्वविश बिश्वास यांनी, "तुम्ही इंधन असलेल्या जमीनीवर माचिसची काडी फेकली तर या द्रव्यरुप इंधनाच्या पृष्ठभागावर तरंगत असलेले रेणू पेट घेतात. या रेणूंमुळेच इंधनाचा गंध येतो. या रेणूंवर नियंत्रण मिळवता आलं तर इंधनाच्या ज्वलनशीलतेवर नियंत्रण मिळवता येतं," असं म्हटलं आहे.

कशापासून बनवलंय हे इंधन?

आपण जेवणात वापरतो तशाच पद्धतीचं पण द्रव्य स्वरुपातील मीठ हे या इंधनाचं मूळ आहे. फक्त हे मीठ लिक्वीड आर्यन म्हणजेच द्रव्य स्वरुपातील लोहाच्या रेणूंपासून बनवलेलं असतं. हे मीठ विघळण्यासाठी लागणारं तापमान हे सर्वसामान्य मीठापेक्षा कमी आहे. या मीठातील आर्यन फ्लूइडमधील क्लोरीन काढून त्या जागी परक्लोरेट वापरण्यात आलं आहे. अनेक चाचण्यांमधून नव्या पद्धतीने तयार करण्यात आलेलं हे इंधन केवळ विद्युत प्रवाहाच्या माध्यमातूनच सक्रीय होतं असं दिसून आलं. तसेच विद्युत प्रवाह खंडित केल्यास इंधन जळत राहत नाही. यामुळे या इंधनातून अधिक ऊर्जा मिळते आणि त्याच्या ज्वालाही अधिक प्रखर असतात.

चाचण्यांची गरज

या इंधनाच्या मदतीने वाहनं अधिक सुरक्षित करता येतील. अपघात झाला किंवा चालक वाहन चालवण्याच्या स्थितीत नसेल तर एका स्वीचच्या मदतीने इंधनाची ज्वलन प्रक्रिया खंडित करता येईल. तांत्रिक दृष्ट्या हे इंधन सगळ्या पद्धतीच्या गाड्यांमध्ये वापरता येतं. मात्र वेगवेगळ्या इंजिनमध्ये याच्या चाचण्या करणं गरजेचं आहे. तसेच हे इंधन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्याआधी ते किती परिणामकारक आहे याची चाचपणीही गरजेची आहे.