Smartphone चार्जिंग करताना तुम्ही देखील करताय 'या' गोष्टी? मग तुम्ही खूप मोठी चूक करताय

आम्ही तुम्हाला आज अशा चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही फोन चार्जींग करताना करता.

Updated: Apr 29, 2022, 05:40 PM IST
Smartphone चार्जिंग करताना तुम्ही देखील करताय 'या' गोष्टी? मग तुम्ही खूप मोठी चूक करताय title=

मुंबई : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच लोक स्मार्टफोन वापरतात. दिवसभर मोबाईल वापरल्यानंतर त्याची बॅटरी संपते आणि तुम्ही मोबाईल पुन्हा चार्ज करता. परंतु बरेच लोक मोबाईल चार्ज करताना अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. एवढेच नाही तर चुकीच्या पद्धतीने मोबाईल चार्ज केल्याने बॅटरी खराब होण्याची शक्यता वाढते.

आम्ही तुम्हाला आज अशा चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही फोन चार्जींग करताना करता. ज्या तुम्ही मोबाईल चार्ज करताना अनेकदा करत असता आणि तुम्हाला त्याबद्दल माहितीही नसते.

जर तुम्‍हाला फोनची बॅटरी खराब होण्‍यापासून वाचवायची असेल आणि ती दीर्घकाळ टिकवायची असेल, तर तुमचा स्मार्टफोन नेहमी मूळ चार्जरने चार्ज करा.

जर तुम्ही फोन इतर चार्जिंगने किंवा साध्या चार्जरने चार्ज केला, तर त्याचा तुमच्या फोनच्या बॅटरीवर वाईट परिणाम होतो. असे सतत केल्याने तुमच्या फोनची बॅटरी देखील खराब होऊ शकते. त्यामुळे फोनसोबत येणारा चार्जरच वापरा.

अनेक जण मोबाईल कधीही चार्ज करतात. म्हणजे बॅटरी ९० टक्के चार्ज झाला तरी मोबाईल चार्ज होतो. फोन वारंवार चार्ज केल्याने बॅटरीवर दबाव येतो. ज्यामुळे फोन किंवा त्याची बॅटरी खराब होण्याची शक्यता आहे.

लक्षात ठेवा जेव्हा फोनची बॅटरी 20 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल, तेव्हाच मोबाइल चार्जवर ठेवा. असे केल्याने बॅटरीवर कोणताही दबाव येणार नाही आणि बॅटरी लवकर खराब होणार नाही.

अनेक वेळा लोक कव्हरसह फोन चार्जिंगवर ठेवतात, परंतु असे करू नये. असे म्हटले जाते की, मोबाइल कव्हरसह फोन चार्जिंगवर ठेवल्याने फोनच्या बॅटरीवर दबाव येतो आणि तो खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही फोन चार्जवर ठेवता तेव्हा कव्हर काढून टाका.

अनेक वेळा फोन लवकर चार्ज करण्यासाठी लोक फास्ट चार्जिंग अॅप डाउनलोड करतात. परंतु, हे असे अॅप फोनच्या बॅकग्राउंडमध्ये सतत चालू असतात आणि तुमच्या फोनची बॅटरी जास्त वापरतात. यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते. म्हणूनच तुम्ही हे थर्ड पार्टी ऍप्स वापरू नयेत.