बॉलिवूड कलाकारांचे 'ते' पर्सनल चॅट कसं लीक झालं, Whatsappचं स्पष्टीकरण

दीपिकाचं समोर आलेलं चॅट 2017 मधलं आहे.

Updated: Sep 26, 2020, 10:48 AM IST
बॉलिवूड कलाकारांचे 'ते' पर्सनल चॅट कसं लीक झालं, Whatsappचं स्पष्टीकरण title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : सुशांत प्रकरणावरुन सुरु झालेल्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर येत आहेत. या प्रकरणात बॉलिवूड कलाकरांचं व्हॉट्सऍप चॅट सतत चर्चेत आहे. सुशांतच्या निधनानंतर सुरु झालेल्या चौकशीदरम्यान, ड्रग्जबाबत अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. एनसीबीने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह अनेकांना ताब्यात घेतलं आहे. त्याशिवाय एका-मागे एक बॉलिवूड सेलिब्रिटींचं जुनं व्हॉट्सऍप चॅटही उघड होत आहे.

आता या प्रकरणी दीपिकाचं ड्रग्ज चॅट समोर आल्यानंतर एनसीबीने तिला समन्स पाठवला. दीपिकाचं हे समोर आलेलं चॅट 2017 मधलं आहे. दीपिकाने ड्रग्ज चॅट डिलीट केल्यानंतरही, वर्षांपूर्वीचं चॅट आता एनसीबीकडे कसं आलं?

व्हॉट्सऍपने दावा केला आहे की, त्यांचे सर्व चॅट एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन (End to end Encrypted) असतात. याचा अर्थ हे चॅट केवळ पाठवणारा आणि ज्याला पाठवलं तो वाचू शकतो. व्हॉट्सऍपही हे चॅट वाचू शकत नाही कारण चॅट कोणत्याही सर्व्हरवर सेव्ह होत नाही. परंतु सुशांतच्या मृत्यूप्रकरणी चौकशीदरम्यान लीक झालेल्या अनेक चॅटमुळे कंपनीच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन व्हॉट्सऍपच्या सर्व चॅटला प्रोटेक्ट करते. सेंडर आणि रिसिव्हरशिवाय चॅट्स कोणी वाचू शकत नाही. व्हॉट्सऍपवर फोन नंबरद्वारे लॉगइन केलं जातं. त्यामुळे कंपनीही मेसेज कंटेंट एक्सिस करु शकत नाही. कंपनी Operating System Manufacturers च्या संपूर्ण गाईडलाईन्स पाळतात. त्यामुळे केवळ फोन डिव्हाईसवर चॅट सेव्ह होऊ शकतात.

सुशांत राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया साहाद्वारे दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्माचं चॅट एनसीबीच्या हाती लागलं असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयाने तिच्या व्हॉट्सऍप चॅटचा बॅकअप Google Drive किंवा iCloud वर घेतला होता. 

कोणताही बॅकअप प्लॅटफॉर्म, व्हॉट्सऍपच्या एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही. अशात जर कोणत्याही तपास यंत्रणेने एखाद्या संशयिताच्या फोनचा डेटा दुसऱ्या कोणत्याही डिव्हाईसवर कॉपी केल्यास, फोन क्लोनिंगचा वापर होतो. ज्याद्वारे Backed up Chats सहजपणे वाचले जाऊ शकतात.  Law enforcement agencies आणि बॉलिवूड कलाकारांच्या लीक चॅटसोबत अशाच प्रकारची बाब झाल्याचं समजतं आहे.