भारतानंतर आता हा देश करतोय चीनविरोधात लढण्याची तयारी

चीनला टक्कर देण्यासाठी आणखी देश करतोय तयारी

Updated: Jul 1, 2020, 09:19 PM IST
भारतानंतर आता हा देश करतोय चीनविरोधात लढण्याची तयारी title=

मुंबई : जगातील वेगवेगळे देश आता चीनला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना विषाणू जगभरात अनेक देशांमध्ये थैमान घालत आहे. दुसरीकडे आक्रमक विस्तारवादी धोरणाबद्दल देखील आता इतर देश पुढे येत आहेत. भारताने चिनी ५९ अॅपवर बंदी घातल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी चीनवर दबाव वाढवण्यासाठी नवी घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाने कोरोना विषाणूबाबत स्वतंत्र चौकशीची मागणी केल्यानंतर चीन-ऑस्ट्रेलियामधले संबंध ताणले गेले आहेत.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी बुधवारी म्हटले की, ऑस्ट्रेलिया पुढील दहा वर्षांत आपले संरक्षण बजेट 40 टक्क्यांहून अधिक वाढवेल आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी मोठे शस्त्र खरेदी करेल. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान पीएम मॉरिसन म्हणाले की, येत्या दहा वर्षांत ऑस्ट्रेलिया हवाई, समुद्र आणि भूमीवर लांबपर्यंत हल्ला करणारे शस्त्रे खरेदी करण्यासाठी १८६ अब्ज डॉलर्स खर्च करेल. ऑस्ट्रेलियाची ही घोषणा इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनला आव्हान म्हणून पाहिली जात आहे.

मॉरिसन म्हणाले की, ऑस्ट्रेलिया आपले सैन्य इंडो-पॅसिफिक प्रदेशात केंद्रीत करेल. चीनचे नाव न घेता ते म्हणाले की, "आम्हाला हिंद प्रशांत क्षेत्र कोणा एकाच्या दादागिरीपासून आणि एकाच्या वर्चस्वापासून मुक्त ठेवायचा आहे. आम्हाला हा भाग आंतरराष्ट्रीय नियम आणि तरतुदींच्या अनुषंगाने सर्व मोठे आणि छोटे देशांना मुक्तपणे व्यापार करता येईल असा ठेवायचा आहे.

मॉरिसन यांनी चीनचं नाव न घेता त्यांना हा इशारा दिला आहे. सिडनी येथील लोई इन्स्टिट्यूट इंटरनॅशनल सिक्युरिटी प्रोग्रामचे संचालक सॅम रोजेवीन यांनी रॉयटर्सशी बोलताना म्हटलं की, "चीन एक असा देश आहे ज्याला अनेक देश सहन करत आहेत. पण कोणालाही त्याविरोधात बोलायचे नाही. त्यामुळे फक्त आपल्या देशावर लक्ष केंद्रित करणे अगदी योग्य आहे. जमिनीपासून लांब पर्यंत हल्ला करणारी क्षेपणास्त्रं खरेदी करणे म्हणजे चीनला पलटवार करण्यासाठी आमंत्रण देण्यासारखं आहे.'

मॉरिसन म्हणाले की, 'ऑस्ट्रेलिया सुरुवातीला यूएस नेव्हीकडून 200 लांब पल्ल्याची अँटी-शिप मिसाईल खरेदी करेल. याशिवाय ध्वनीपेक्षा पाच पट वेगवान हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याबाबत देखील विचार करेल.'

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नाराजी देखील शस्त्रे खरेदी करुन ऑस्ट्रेलिया दूर करु शकते. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामुळे चीनशी असलेले संबंध आणखी बिघडतील अशी अपेक्षा आहे. पॅसिफिक महासागरात यापूर्वीच दोन देशांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे.

चीनने नुकतीच ऑस्ट्रेलियाची अनेक उत्पादने आयात करण्यास बंदी घालून ऑस्ट्रेलियावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आर्थिक नुकसानीची धमकी देऊन कोणीही आम्हाला भीती दाखवू शकत नाही असे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

चीनच्या हुवे कंपनीला आपल्या 5 जी ब्रॉडबँड नेटवर्कमधून काढून ऑस्ट्रेलियाने 2018 मध्ये चीनला मोठा धक्का दिला होता.