इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला, १२ क्षेपणास्त्रांचा मारा

इराण अमेरिका संघर्ष शिगेला पोहोचलाय.

Updated: Jan 8, 2020, 07:37 AM IST
इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला, १२ क्षेपणास्त्रांचा मारा title=
फोटो सौजन्य : @FarsNews_Agency

काहिरा : इराण अमेरिका संघर्ष शिगेला पोहोचलाय. इराणने बुधवारी पहाटे इराकमधल्या अमेरिकेच्या दोन तळांवर जोरदार रॉकेट हल्ला चढवला. इराणने अमेरिकेच्या दोन तळांवर तब्बल १२ रॉकेट्सचा मारा केला. अमेरिकेच्या ऐन अल असद आणि इरबिल या दोन तळांवर इराणने मारा केलाय.

विशेष म्हणजे हल्ला केल्याचा दावा कोणत्याही इराण समर्थक गटाने केलेला नाही तर इराणने अधिकृतरित्या हल्ला केल्याचं जाहीर केलंय. तसंच पेंटागॉननेही हल्ला झाल्याचा कबूल केलंय. इराणचा टॉपचा कमांडर जनरल कासीम सुलेमानी आणि इराकचा कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस यांच्या हत्येनंतर इराणमध्ये संताप आहे.

अमेरिकेचा बदला घेण्याची प्रतिज्ञा इराणने घेतलीय. हल्ल्यांची माहिती घेतली जात आहे असं पेंटागॉनने म्हटलंय. सैनिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं अमेरिकेने म्हटलंय.

इराणने अमेरिकेच्या तळांवर हल्ला चढवल्यावर जागतिक बाजारात इंधन दर कमालीचे भडकलेत. कच्चा तेलाच्या दलात ४ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे बाजारात कच्चा तेलाचा प्रति बॅरल दर ६५ डॉलर्सवर पोहोचला आहे. याचा परिणाम भारतातल्या पेट्रोल-डिझेलच्या दरांवर आणि सोन्याच्या दरांवरही होणार आहे.