कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेण्याचा भाजपाचा प्रयत्न म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती असल्याची जळजळीत टीका शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली. काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने WHO धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजनांचे कौतुक केले होते. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धारावीत कोरोना नियंत्रणात आणण्याचे श्रेय एकट्या राज्य सरकारला घेता येणार नाही, असे म्हटले होते. धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केले. त्यामुळे सरकार धारावी पॅटर्नचे श्रेय घेण्याचे कारण नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धारावीने कोरोनाचा तीव्र प्रादुर्भाव रोखला; WHOच्या प्रमुखांकडून कौतुक


चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा राहुल शेवाळे यांनी समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्यक्ष कोणी किती मेहनत घेतली, याची साक्ष धारावीतील जनताच देईल. मोठेपणा हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. उगीच नको त्या विषयात राजकारण करून जनतेच्या भावनांचा अनादर करणे विरोधकांना महागात पडेल. अशा कठीण प्रसंगात दिवसरात्र सरकारवर टीका करायची आणि चांगल्या कामगिरीच्या श्रेयासाठी रेटून खोटं बोलायचं, ही दुटप्पी भूमिका असल्याचे शेवाळे यांनी म्हटले. 

विरोधी पक्ष डिझास्टर टूरिझममध्ये व्यस्त; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला


ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत त्याचे कौतुक केलं पाहिजे. पण चुकीच्या गोष्टीवर टीका करायची नाही का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी 'धारावी' कोरोनाचा केंद्रबिंदू ठरली. पण या धारावीने कोरोनावर मात केली आहे. पण याचं श्रेय सरकारचं नसून राष्ट्रीय स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून केलेल्या स्क्रिनिंगला जातं, असा दावा चंद्रकांत पाटील यांन केला होता.