TV Artist Dies In Accident: प्रसिद्ध अभिनेत्रीचा बाईक अपघातात जागीच मृत्यू

TV Artist Dies In Accident: शनिवारी रात्री शुटींग संपल्यानंतर अॅपवरुन बाईक बुक करुन ही अभिनेत्री घरी जात असतानाच तिच्या बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात या अभिनेत्रीने जागीच प्राण सोडला.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 21, 2023, 05:54 PM IST
TV Artist Dies In Accident: प्रसिद्ध अभिनेत्रीचा बाईक अपघातात जागीच मृत्यू title=
TV Artist Dies In Accident

Suchandra Dasgupta Dies: बंगाली मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता (Suchandra dasgupta) हिचं अपघाती निधन झालं आहे. सुचंद्राच्या निधनामुळे तिच्या चाहत्यांबरोबरच पश्चिम बंगालमधील मनोरंजन सृष्टीलाही मोठा धक्का बसला आहे. शनिवारी रात्री मालिकेच्या शुटींगनंतर घरी परत येत असतानाच सुचंद्राचा अपघात झाला. सुचंद्रा कोलकात्यामधील पानीहाटी येथे राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुचंद्राने अॅपवरुन बाईक बुक केली होती. घरी जाताना सुचंद्राच्या या बाईकला घोष पारा परिसरामध्ये अपघात झाला. यात सुचंद्राचा जागीच मृत्यू झाला. सुचंद्रा 29 वर्षांची होती. 

ब्रेक दाबला अन्...

बाईक चालवणाऱ्या व्यक्तीने अचानक समोर एक सायकल आल्याने सायकलचालका वाचवण्यासाठी जोरात ब्रेक दाबला. अचानक ब्रेक दाबल्याने मागे बेसावध बसलेली सुचंद्रा गाडीपासून काही फूट अंतरावर पडली. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या लॉरीने सुचंद्राला चिरडले. प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार सुचंद्राने हेल्मेट घातलं होतं. मात्र अपघाताची तिव्रता इतकी होती की सुचंद्राचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांनी मदतीचा प्रयत्न केला पण सुचंद्राने जागीच प्राण सोडला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी लॉरीच्या चालकाला अटक केली आहे. सुचंद्राच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक बंगाली मालिकांमध्ये सुचंद्राने छोट्यामोठ्या भूमिका केल्या आहेत. विश्वरुप बंडोपाध्याय आणि मोहाना मिते या कार्यक्रमांमध्येही तिने भूमिका साकारली होती. 

स्थानिकांचं आंदोलन

मागील काही काळापासून पश्चिम बंगालमधील मेट्रो शहरांमध्ये अशाप्रकारच्या अपघातांची संख्या वाढली आहे. सुचंद्राचा अपघाती मृत्यू झाल्याने 24 उत्तर परगना येथील बारानगरमधील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आज सुचंद्राचा अपघात झाला त्या ठिकाणी या नागरिकांनी आंदोलन केलं. यामुळे येथे काही काळ वाहतुककोंडी झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरुन बाजूला करुन काही काळाने वाहतुक सुरळीत केली. या ठिकाणी रस्त्यावरील अपघात रोखण्यासंदर्भातील सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची नागरिकांची फार पुर्वीपासूनची मागणी आहे. मात्र स्थानिक प्रशासनाकडून याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही अशी स्थानिकांची तक्रार आहे.