... तर राष्ट्रीय पुरस्कारांची विश्वासार्हता धोक्यात- कंगना रानौत

कंगना रानौत हिने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांविषयी अतिशय लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. 

Updated: Mar 25, 2019, 01:10 PM IST
... तर राष्ट्रीय पुरस्कारांची विश्वासार्हता धोक्यात- कंगना रानौत  title=

मुंबई : कोणाच्याही पाठिंब्याशिवाय या कलाविश्वात आपलं असं वेगळं आणि तितकच भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौत हिने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांविषयी अतिशय लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. आपण मुख्य भूमिका साकारलेल्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाला किंवा स्वत:ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही, तर एक प्रकारे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्हं उभं राहील, असं विधान तिने केलं आहे. 

वाढदिवसाच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना कंगनाने हे वक्तव्य केल्याचं वृत्त ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं आहे. ‘मला किंवा माझ्या मणिकर्णिका या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही, तर पुरस्कारांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्हं उभं राहील. पण, त्याहून कोणती चांगली कलाकृती माझ्या निदर्शनास आली, तर मात्र ती कलाकृती खरंच माझ्या चित्रपटाहून चांगली असेल हे मान्य करावं लागेल’, असं तिने स्पष्ट केलं. अभिनेत्री तब्बूच्या अभिनयाची तिने प्रशंसा केली. 

‘‘अंधाधुन या चित्रपटात तब्बू यांनी अप्रतिम भूमिका निभावली होती. त्यांचं काम पाहून मी भारावूनच गेले होते. त्याचप्रमाणे आता यंदाच्या वर्षी ‘मणिकर्णिका...’हून चांगली कामगिरी कोणी केली आहे का, हे लवकरच सर्वांसमोर येणार आहे. जसं असल्यास मी स्वत: त्यांची प्रशंसा करेन. पण, मला नाही वाटत तसं काही घडेल’’, असं म्हणत कंगना तिच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याविषयी आग्रही असल्याचं पाहायला मिळालं. 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विश्वासार्हतेविषयी भाष्य करणाऱ्या कंगनाने आतापर्यंतच्या १३ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर तिचं नाव कोरलं आहे. ‘फॅशन’, ‘क्वीन’ आणि ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ या चित्रपटांसाठी तिला गौरवण्यात आलं आहे. त्यामुळे आता ‘मणिकर्णिका....’च्या निमित्ताने आणखी एका राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवण्यास कंगना यशस्वी ठरते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.